Mg id top
Loading...

भाजपचा तगडा उमेदवार पाडण्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्याचे खुले पत्र!

कणकवली – देवगड – वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनो

सप्रेम नमस्कार,

Loading...

गेल्या महिना भरात घडलेल्या घडामोडी परत सांगण्यात काही अर्थ नाही. पण आज तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. काँग्रेसचे तत्कालीन नेते स्वर्गीय श्रीधर नाईक यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर १९९१ साली २४ वर्षांचा संदेश भास्कर पारकर पहिल्यांदा कणकवलीचा सरपंच झाला. संदेशची कणकवली आणि कणकवलीचा संदेश असे समीकरण आजही आहे.

गेल्या २८ वर्षांत या संदेश पारकरने मार खाल्ला. मार दिला. संघर्ष केला. कोर्टात केला, रस्त्यावर केला, निवडणुकीत केला. तो संघर्ष एका व्यक्तीविरोधात नव्हता तर एका प्रवृत्तीविरोधात होता. आजही आहे. त्यात माझे सख्खे मित्र दूर झाले, काही माझ्या विरोधात लढले. काही जिंकले आणि काही हरले. माझा प्रवास सुरूच आहे.

ते सुधारले असतील असे मला वाटले होते. मी त्यांच्याशी काही काळ मैत्री केली हे खरे आहे. पण कडू कारले साखरेत घोळले तरी ते कडूच राहणार, हे माझ्या लक्षात आले नाही हि माझी चूक आहे, हे मान्य. त्या प्रवृत्ती सुधारल्या नाहीत. त्यांच्याशी लढताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आता भाजप असा माझा प्रवास झाला आहे. पण भालचंद्र महाराजांच्या कृपेने गेल्या २८ वर्षात ज्याच्या बरोबर संदेश तो आमदार हे ठरलेले आहे.

जिल्हा भाजपचे अध्यक्ष प्रमोद जी जठार हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. २००९ साली मी त्यांच्याबरोबर नसतो तर ते आमदार झाले नसते. आणि २०१४ साली मी त्यांच्याबरोबर असतो तर ते पुन्हा आमदार झाले असते. २०१४ साली मी नितेश बरोबर होतो म्हणून ते आमदार झाले, हे वास्तव आहे.

जठारांचा राणेंनी पराभव केला. जठराच्या संस्था बंद पाडल्या. बदनामी केली. जठरांना मदत केल्याच्या संशयावरून कित्येक लोकांनी मार खाल्ला. जठार आणि राणे संघर्षात मी नंतर जठरांना साथ दिली. त्यांच्या सल्ल्याने आणि सूचनेवरून भाजपात दाखलझालो. पक्षात काम केले. संघटना वाढवली. पण त्याच जठरांनी आपल्या धाकट्या भावाचे प्रेम, पक्षावर झालेला अन्याय विसरून त्याच राणेंना पक्षात प्रवेश दिला.

मित्रांनो, हि कणकवली आहे. भालचंद्र महाराजांचे पाय या भूमीला लागले आहेत. पाप आणि पुण्याचा हिशोब देव करीत असतोच. आज वाईट प्रवृत्ती खूपच माजल्या आहेत. त्यांनी देवगडात भाजपच्या निष्ठावंत घराण्यावर अंडी मारली. सावरकरांवर वाईट भाषेत टीका केली. बाबासाहेब पुरंदरेंना शिव्या दिल्या. संघावर चिखल उडवला. नोकरशहांवर दहशत माजवली. कुणी कणकवली तालुक्यात येणार नाही याची सोय केली. जठार साहेब त्या गोष्टी विसरले असतील. पण संघाच्या शिस्तीत वाढलेला कडवट कार्यकर्ता त्या गोष्टी कधीच विसरणार नाही.

आज निवडणूक तोंडावर आहेत. ज्या राणेंनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यायला हवा, त्याच पक्षाने राणेंचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. आज संघ आणि मोदी भाजप कि राणे भाजप, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्या भाजपचे कार्यकर्ते मार खातील, पदावरून जातील आणि तिथे राणेंचे टगे कार्यकर्ते असतील.

या अप्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी मि रिंगणात उभा होतो. आमचे मित्र सतीश सावंत यांनीही शिवसेनेकडून रिंगणात उडी घेतली आहे. आज जर या अप्रवृत्ती नष्ट झाल्या नाहीत तर भविष्यात त्यांचा सामना करणे कठीण होईल. हि वाळवी फक्त भाजपचं नाही तर अक्खा जिल्हा पोखरून खाईल. म्हणून त्यांचा आजच नायनाट करणे आवश्यक आहे.

म्हणूनच एकास एक लढत देण्याचा निर्णय मी घेतला आहे. मी, भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मनातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश सावंत यांना पाठिंबा देत आहे. हा फक्त माझा पाठिंबा नाही. भाजपवर प्रेम आणि निष्ठा असणाऱ्या भावनांचा आणि निष्ठेचा हा पाठिंबा आहे. या वेळेस हि वाळवी नष्ट होईल आणि या मतदारसंघावर खऱ्या अर्थाने भगवा फडकेल याची खात्री बाळगतो.

वंदे मातरम!
भारत माता की जय!

आपला,
संदेश पारकर,
भारतीय जनता पार्टी

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *