Mg id top
Loading...

कारगिल युद्धादरम्यान वर्ल्डकपमध्ये तेंडुलकर आउट झाल्यानंतर पाकिस्तानी संसद आनंदली होती

कधीकाळी एकच भूभाग असणाऱ्या अखंड भारताची फाळणी झाली आणि १९४७ साली भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. त्यानंतर पाकिस्तानने जबरदस्ती काश्मीरमध्ये सैन्य घुसवून काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न केला, परंतु २६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरच्या राजाने भारतात सामिलीकरणाच्या कारवार स्वाक्षऱ्या केल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानी लष्कराचे मनसुबे उधळून लावले. १९७१ मध्ये भारताने लष्करी कारवाईच्या सहाय्याने पाकिस्तानापासून बांगलादेश वेगळा करुन पाकिस्तानला मोठा हादरा दिला. तेव्हापासून पाकिस्तानच्या कुरापती वाढत गेल्या. त्याचाच भाग म्हणजे कारगिल युद्ध !

कारगिल युद्ध

Loading...

पाकिस्तानने ज्या ज्या वेळी भारताची कुरापत काढली, त्या त्या वेळेस त्यांना नाचक्की वाट्याला आली. १९९० पासून भारतीय सेनेने काश्मीरमध्ये कायमस्वरुपी सैन्य तैनात केले. १९४७, १९७१ नंतर १९९९ मध्येही पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताची खोड काढण्याचा असाच प्रयत्न केला. सीमारेषा ओलांडून त्यांनी भारतीय हद्दीतल्या कारगिल परिसरातील अनेक ठाणी बळकावली.

मे १९९९ मध्ये भारतीय सेनेला ही खबर कळली. त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय तर भारतीय वायुदलाने ऑपरेशन शुभ्र समुद्र या नावाखाली कारगिल युद्धाची कारवाई सुरु केली. भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या बंदरांची कोंडी केली. ३ मे ते २६ जुलै १९९९ पर्यंत हे युद्ध चालले. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा माज उतरवत हे युद्ध जिंकले.

भारत-पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप सामना

१९९९ चा क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये १४ मे ते २० जून दरम्यान खेळवला गेला. एका बाजूला भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध सुरु असताना ८ जून १९९९ रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांसमोर आले. क्रिकेटच्या मैदानावरचा हा सामना युद्धापेक्षा कमी नव्हता. या सामन्यावर कारगिल युद्धाचे सावंत स्पष्ट दिसत होते. या सामन्यामध्ये दोन पाकिस्तानी प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलण्यात आले, कारण त्यांनी हातात घेतलेल्या फलकावर लिहले होते, “वर्ल्डकप आणि कारगिल दोन्ही आमचे आहेत !”

सचिन आऊट होताच पाकिस्तानी संसद आनंदली

भारत-पाकिस्तान सामन्यात गांगुली आजारी असल्याने बाहेर होता. त्यावेळी “शोएब अख्तरला घाबरुन गांगुली बाहेर बसला” अशा बातम्या पाकिस्तानी मीडियात लागल्या. मॅच सुरु झाली. दोन्ही देशातील लोक या सामन्याकडे डोळे लावून बसले. पाकिस्तानी संसद देखील कारगिल आणि वर्ल्ड कप या दोन्ही ठिकाणच्या अपडेट घेत होती. अझहरुद्दीनने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वसीम अक्रम, शोएब अख्तर, अब्दुल रझ्झाक, अजहर मेहमूद हे पाकिस्तानी बॉलर आग ओकायला लागले.

३७ धावांवरच रझ्झाकने सदागोपन रमेशचा स्टंप उखाडला. त्यानंतर द्रविड मैदानात आला. कशीबशी सचिन तेंडुलकरसोबत त्याने ५० धावांची भागीदारी केली. परंतु अजहर मेहमूदच्या एका चेंडूवर सचिन कॅचआऊट झाला. मैदानात एकच जल्लोष झाला. कारगिल युद्धभूमीवरुन येणाऱ्या पाकिस्तानच्या नाचक्कीच्या बातम्या ऐकून पाकिस्तानी संसदेवर शोककळा पसरली होती.

अचानक पाकिस्तानच्या सूचना मंत्र्यांनी संसदीय कार्यवाही सुरु असताना मध्येच एक घोषणा केली, “सचिन तेंडुलकर आऊट झाला आहे.” पाकिस्तानी संसदेत एकच जल्लोष झाला. सगळ्यांनी आनंद साजरा केला. पण वेंकटेश प्रसाद, जवागल श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांनी योग्य मारा करत भारताला ४७ धावांनी विजय मिळवून दिला. पाकिस्तान वर्ल्डकपही हरला आणि कारगिल युद्धही…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *