स्वतंत्र भारतात ३७ वर्षे दिल्लीच्या तख्तावर नव्हता मुख्यमंत्री, काय होते कारण ?

आपण जर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची यादी पाहिली तर आपल्याला त्यात एक वेगळीच गोष्ट दिसुन येते. दिल्लीचा पहिला मुख्यमंत्री १९५२ ते ५५ दरम्यान तर दुसरा मुख्यमंत्री १९५५ ते ५६ या काळात दिल्लीचा कारभार पाहत होता. त्यानंतर तिसरे मुख्यमंत्री म्हणुन थेट १९९३ मध्ये मदनलाल खुराणा यांचा कार्यकाळ सुरु झाला. परंतु मधले जवळपास ३७ वर्षे दिल्लीला कुणीही मुख्यमंत्री नव्हता. याच्यामागे काय कारण असेल ? चला तर जाणून घेऊया…

१९५६ ते १९९३ या ३७ वर्षात दिल्लीचा कारभार कोण करत होते ?

स्वातंत्र्यानंतर देशाची जी राज्यघटना तयार झाली, त्यामध्ये तीन प्रकारच्या राज्यांची व्यवस्था केली गेली होती. विभाग अ मध्ये नऊ राज्ये होती जी राज्यपाल आणि निवडून आलेले विधानसभा सदस्य चालवणार होते. विभाग बी मध्ये आठ राज्ये ठेवली गेली, ज्यांचा कारभार राष्ट्रपती नियुक्त राज्यप्रमुख आणि जनतेने निवडून दिलेल्या विधानसभेने करायचा होता. विभाग क मध्ये १० राज्ये होती, जी राष्ट्रपतींनी नेमलेल्या मुख्य आयुक्तालयाच्या अधीन होती. दिल्ली यापैकी विभाग की मध्ये होती. त्यानंतर दिल्लीत विधानसभेची स्थापनाही झाली.

दिल्ली विधानसभेत ४८ सदस्य होते. मुख्य आयुक्तांना कारभार चालवण्यात मदत करण्यासाठी मंत्री मंडळाची स्थापना केली गेली. दिल्लीत पहिली विधानसभा १७ मार्च १९५२ ला स्थापन झाली. चौधरी ब्रह्मप्रकाश यांना पहिले मुख्यमंत्री केले गेले. १९५५ मध्ये ब्रह्मप्रकाश यांना पदावरुन काढून गुरुमुख निहाल सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

१९५५ मध्ये राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना झाल्यानंतर फजल अली आयोगाच्या शिफारशींनुसार दिल्लीचा विभाग क मधील राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला. दिल्ली विधानसभेचे विघटन झाले आणि दिल्लीला केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले. या आयोगाच्या सल्ल्यानंतर दिल्ली महानगरपालिका स्थापन केली गेली. परंतु दिल्ली विधानसभेची पुन्हा स्थापना केली जावी ही मागणी तिथूनच जोर धरु लागली.

शेवटी १९९१ मध्ये संसदेमध्ये ६९ व्या घटनादुरुस्तीने दिल्लीला विशेष दर्जा देऊन राष्ट्रीय राजधानीचा प्रदेश घोषित करण्यात आला. लेफ्टनंट गव्हर्नर यांना दिल्लीचा प्रशासक बनविण्यात आले. घटनात्मक बदलांसाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीटी कायदा, १९९१) कायदा मंजूर करण्यात आला. या नव्या कायद्यांतर्गत १९९३ मध्ये पुन्हा एकदा दिल्लीत विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. त्यावेळी भाजपने बहुमताने सरकार स्थापन केले. मदनलाल खुराना दिल्लीचे मुख्यमंत्री बनले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *