घर किंवा फ्लॅट घ्यायच्या आधी या गोष्टी तपासून मगच घ्या !

आपलंही एखादं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जुन्या पद्धतीचे वाडे, बंगले अशा गृहरचना आता लोप पावायला लागल्या असून अपार्टमेंट गृहरचना वेगाने उभारल्या जात आहेत. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आरामदायी सुविधांनी युक्त अशा अपार्टमेंटमध्ये घर घेण्याकडे कल वाढला आहे. आयुष्यभर साठवलेल्या पै पै मधून स्वतःसाठी घर किंवा फ्लॅट विकत घ्यायचं असतं, त्यामुळे अशावेळी ते लोक भारावून गेलेले असतात. परंतु कधीकधी यामध्ये सतर्कता बाळगायचे भान राहत नाही आणि नंतर फसवणूक झाल्यावर पश्चातापाची वेळ येते. आज आम्ही तुम्हाला घर किंवा फ्लॅट घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची ते सांगणार आहोत.

१) जाहिरातीला भुलू नका – लग्न करण्यापूर्वी किंवा लग्नानंतर नवीन जोडप्याला नवीन घरात राहायला जायची घाई झालेली असते. अनेक बांधकाम व्यावसायिक वेगवेगळ्या जाहिरातीची होर्डिंग्ज लावून लोकांना आपल्या स्कीममध्ये फ्लॅट घेण्यासाठी आकर्षित करतात. लोक जाहिरातीला भुलून कर्ज किंवा इतर माध्यमातून बांधकाम व्यावसायिकाशी घरासाठी व्यवहार करतात. परंतु अशा व्यवहारात कधीकधी फसवणूकही होऊ शकते. वेळेवर घराचा ताबा मिळत नाही, त्यामुळे दुसरीकडे भाडे देऊन राहावे लागते. त्यात कर्जाचा हप्ता चालू असतो. त्यामुळे जाहिरातीला भुलू नका.

२) हे तपासा – फ्लॅट विकत घेताना कार्पेट एरिया, बिल्ट अप एरिया तपासून घ्या. स्थानिक प्रशासनाने दिलेला संबंधित जागेचा किंवा घराचा मान्यताप्राप्त आराखडा तपासून घ्या. सॅंक्शन टाऊन प्लॅनिंगची परत पाहून घ्यावी. तसेच प्रशासनाने बिल्डरला दिलेला पूर्णत्वाचा दाखलाही तपासून घ्या. बँक लोनसाठी हा दाखला महत्वाचा असतो. बिल्डरकडून पझेशन लेटर म्हणजेच मालकीपत्र घ्या, त्याशिवाय तुम्ही त्या फ्लॅटचे कायदेशीर मालक होत नाही. फ्लॅटच्या भाडे किंवा खरेदीचा योग्य मुद्रांकाच्या स्टॅम्प पेपरवर करारपत्र करा.

३) एजंटकडून नाही, स्वतःच करा ही तपासणी – आपण ज्या जागेवर घर किंवा फ्लॅट घेणार आहोत, त्याच्या मिळकतीचा इतिहास शासनाच्या वेबसाईटवरुन igrmaharashtra .gov.in किंवा जिल्हा निबंधकाच्या कार्यालयातून तपासून घ्या. त्यात त्या मिळकतीवरील कर्जाचा बोजा, पूर्वीची खरेदी-विक्रीची माहिती, हिस्सेदार या गोष्टी समजतात. घर घेणार ती जागा नॉन ऍग्री आहे का, संबंधित बांधकाम कायदेशीर आहे का, बिल्डिंगची रचना टाऊनप्लॅनिंग डिपार्टमेंटच्या परवानगीने झाली का इत्यादींची माहिती घ्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *