या प्रसंगाने बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडकेंना एकमेकांचे जिवलग मित्र बनवले

बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्यातील मैत्रीचे किस्से आपण अनेकदा ऐकले असतील. बाळासाहेब ठाकरेंचे मराठी माणूस, मराठी भाषेवर प्रचंड प्रेम होते. दादा कोंडके एक अस्स्सल मराठी कलाकार असल्यामुळे बाळासाहेबांचा त्यांच्यावर विशेष जीव होता. दादांना कुठेही अडचण आली तर बाळासाहेब त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहायचे. दुसऱ्या बाजूला दादाही कसलीच भीती न बाळगता मनापासून शिवसेनेच्या स्टेजवर जाऊन सभा गाजवायचे. कोल्हापूरच्या बिंदू चौकातील दादा कोंडकेंचे तडाखेबाज भाषण याला साक्ष आहे. बाळासाहेब आणि दादा यांच्यातील या जिवलग मैत्रीचा अध्याय ज्या प्रसंगापासून सुरु झाला, तो प्रसंग आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

दादा कोंडकेंचा पहिला चित्रपट बाळासाहेबांच्या मदतीने झळकला कोहिनुर थिएटरमध्ये

त्याकाळी मुंबईमध्ये मराठी चित्रपटांना थिएटर मिळण्यासाठी हिंदी सिनेमांसोबत स्पर्धा करावी लागायची. थिएटरमध्ये शो मिळत नसायचे. अशातच १९७३ मध्ये दादांनी प्रचंड मेहनत घेऊन त्यांचा “सोंगाड्या” हा पहिला चित्रपट तयार केला होता. परंतु दादांची आर्थिक परिस्थिती नसल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी थिएटर मिळण्यात अडचणी येत होत्या. दादांनी कोहिनुर थिएटरच्या मालकाकडे सोंगाड्या लावण्यासाठी विचारणा केली, पण त्याने दादांना नकार दिला. दादांनी ही गोष्ट बाळासाहेबांच्या कानावर घातला. बाळासाहेबांनी लागलीच कोहिनूरच्या मालकाला आदेश दिला आणि कोहिनूरमध्ये दादांचा सोंगाड्या झळकला. या चित्रपटाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आणि दादांनी पुढे अनेक चित्रपट तयार केले.

गुंडांच्या मदतीने थिएटर मालकाने दादा कोंडकेंना लावले हाकलून

मुंबईमधील “भारतमाता” थिएटर सोडले तर इतर थिएटरमध्ये मराठी चित्रपट लावायला थिएटरमालक टाळाटाळ करायचे. सोंगाड्या आणि एकटा जीव सदाशिवच्या निर्मितीनंतर दादांनी राम राम गंगाराम चित्रपट काढला. चित्रपटासाठी दादांनी मराठा मंदिरच्या मालक फिरदोस तारापोरवाला ह्याच्याशी ४ महिने आधी प्रदर्शनासाठी करार केला होता. मराठा मंदिरमध्ये हाथी मेरे साथी आणि बॉबी हे हिंदी चित्रपट हाऊसफुल्ल चालले होते. अशामध्ये ठरल्याप्रमाणे राम राम गंगारामचा मॉर्निंग शो लावावा म्हणून दादा तारापोरवालाकडे गेले. परंतु त्याने गुंडांच्या मदतीने दादांना थिएटरबाहेर काढले.

दादांवर गुंड घातल्याची बातमी बाळासाहेबांना समजली आणि…

दादा बाळासाहेबांकडे गेले आणि त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. दादांनी आपल्याला नुकसानीपासून वाचवावे असे आर्जव केले. बाळासाहेब कडाडले, “दादा रडतोय काय ? थांब त्या तारापोरवाल्याचे धोतर फाडून तुझ्या हातामध्ये देतो…” बाळासाहेबांनी भुजबळ आणि मोहन रावलेंना पाठवले. त्यांनी हिंदी चित्रपटांचे बॅनर उतरवून तारापोरवाल्याच्या गचांडीला धरुन बाळासाहेबांसमोर आणले. बाळासाहेबांनी आदेश दिला, “मी सांगतोय तोपर्यंत दादाचा चित्रपट चारही शोला दाखवायचा.” त्यानंतर दादांचा राम राम गंगाराम मराठा मंदिराला तुफान चालला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *