पंकजा आणि धनंजय मुंडेंचं गाव नाथ्रा मध्ये कोण भरलं भारी, कोणाला किती मते मिळाली?

परळी मतदारसंघातून भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा तब्बल ३० हजारांच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पराभव करून या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण केले. मुंडे बहीण-भावाच्या लढतीत पहिल्या फेरीपासूनच धनंजय यांची आघाडी कायम राहिली.

राज्याचे लक्ष लागलेल्या परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, उदयनराजे भोसले यांच्यासह अनेकांनी सभा घेतल्या. मात्र, राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकहाती प्रचार करत मतदारसंघात तब्बल ३० हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला.

मुंडे बहीण-भावातील लढत प्रचारात अटीतटीची दिसत असली तरी प्रत्यक्षात पहिल्या फेरीपासूनच धनंजय यांनी आघाडी घेत शेवटपर्यंत भाजपला धोबीपछाड देत विजय मिळवला.

या बहिण-भावामध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोठा वाद उफाळून आला होता. दोन्ही नेत्यांकडून प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा परळी ३० वर्षांपासून गड होता. मुंडे बहीण भावांचं गाव असलेल्या नाथ्रा गावात धनंजय मुंडेंचं वर्चस्व राहीलं आहे.

यावेळेस देखील धनंजय मुंडे यांनी आपल्या गावात सुद्धा पंकजा मुंडेंना धोबीपछाड दिली आहे. त्यांचं मूळ गाव नाथ्रामध्ये राष्ट्रवादीला ३५० मतांची आघाडी मिळाली. याशिवाय गोपीनाथगड असलेल्या पांगरी गावातही धनंजय मुंडेंनी 800 मतांची आघाडी घेतली.

जिल्ह्यत राष्ट्रवादीने जिंकल्या चार जागा-

बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या सहाही मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसने चार मतदारसंघ मिळवत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. पंकजा यांच्याशिवाय बीडमध्ये शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पराभवाचा धक्का दिला.

आष्टी मतदारसंघातही राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांचा २५हजार ३८५ मतांनी दारुण पराभव केला तर माजलगाव मतदारसंघात माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी पुन्हा मतदारसंघ आपल्या ताब्यात आणला. गेवराई मतदारसंघात भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी अटीतटीच्या लढतीत यश मिळवले. तर केज मतदारसंघात ऐनवेळी भाजपात गेलेल्या नमिता मुंदडा यांनी मोठा विजय मिळवला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *