भाजप शिवसेनेच्या या ८ दिग्गज मंत्र्यांचा झाला पराभव

एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवणारी महाराष्ट्राची निवडणूक आज आपल्याला पाहायला मिळत आहे. महायुतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज सर्व पोल मधून वर्तवण्यात आला होता. महायुतीला बहुमत मिळाले असले तरी त्यांचे संख्याबळ घसरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

महायुतीला १५० हुन अधिक तर महाआघाडीला १०० हुन अधिक ठिकाणी बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. दरम्यान महायुतीच्या अनेक दिग्गज मंत्र्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याचे दिसून येत आहे. पाहूया कोण कोण आहेत ते मंत्री…

१) पंकजा मुंडे, परळी (भाजप) – भाजप सरकारच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यातील निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. धनंजय मुंडेंनी जोरदार लढत देऊन पंकजा मुंडेंचा दारुण पराभव केला आहे.

२) राम शिंदे, कर्जत जामखेड (भाजप) – भाजप सरकारमध्ये मृदा व जलसंधारण तसेच गृहराज्यमंत्री राहिलेल्या राम शिंदे यांना राष्ट्रवादीच्या रोहित पवार या नवख्या उमेदवाराने पराभूत केले आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत.

३) विजय शिवतरे, पुरंदर (शिवसेना) – भाजप-शिवसेना सरकारमध्ये जलसंपदा राज्य मंत्री सारख्या महत्वाच्या खात्याचे काम केलेल्या विजय शिवतरे यांना काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभूत केले असून अजित पवार यांनी शिवतारेंना दिलेले आव्हान खरे करून दाखवले आहे.

४) संजय भेगडे, मावळ (भाजप) – भाजप सरकारमध्ये कामगार, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन आणि पर्यावरण राज्यमंत्री असणाऱ्या संजय उर्फ बाळा भेगडे यांना भाजपमधून बंडखोरी करुन राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या सुनील शेळके यांनी धक्का देत पराभव केला आहे.

५) अर्जुन खोतकर, जालना (शिवसेना) – महायुतीत वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांचा काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला आहे.

६) अनिल बोंडे, मोर्शी (भाजप) – भाजप सरकारमध्ये कृषीमंत्री सारख्या महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या अनिल बोंडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देवेंद्र भुयार यांनी आश्चर्यकारकरित्या पराभवाचा झटका दिला आहे.

७) जयदत्त क्षीरसागर, बीड (शिवसेना) – महायुती सरकारमध्ये फलोत्पादन मंत्री राहिलेल्या शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्यात चुरशीची लढत झाली. यात संदीप क्षीरसागरांनी जयदत्त क्षीरसागरांचा पराभव केला.

८) परिणय फुके, साकोली(भाजप) – साकोलीचे भाजपाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांचा काँग्रेसच्या नाना पटोले यांनी पराभव केला आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेले फुके नंतर पिछाडीवर पडले त्यानंतर ते आघाडी घेऊ शकले नाहीत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *