राष्ट्रवादी कमबॅक करणार? पुण्यात राष्ट्रवादीचे ‘हे ८ उमेदवार’ मारू शकतात बाजी

पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. पण २०१४ ला देशात मोदीलाट आली. अगोदर लोकसभेला भाजपने देशात दणदणीत विजय मिळवला. नंतर झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देखील करिष्मा दाखवत सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारला खाली खेचले.

२०१४ ला भाजपने राष्ट्रवादीच्या पुणे बालेकिल्यावर कब्जा केला. पुणे शहरात असलेल्या ८ हि मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले. तर जिल्ह्यातील इतर मतदारसंघातहि भाजप सेनेला यश मिळालं. राष्ट्रवादीला फक्त ३ जागांवर विजय मिळवता आला होता. बारामतीमध्ये अजित पवार आणि आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे-पाटील तर इंदापूर मध्ये दत्तात्रय भरणे हे विजयी झाले होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचा सध्या एकही आमदार नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे फक्त ३ आमदार आहेत. पण यावेळेस मात्र यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले आहे, असे चित्र आहे.

याच वातावरणाचे रूपांतर मतांमध्ये झाले तर पक्षाच्या जागांची संख्या ३ वरून ८ पर्यंत जाऊ शकते. पुण्यात यावेळी राष्ट्रवादीने चांगले उमेदवार दिले आहेत. बारामती आणि आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचा सहज विजय होईल असे चिन्ह आहेत. तर इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला सीट गमवावी लागू शकते.

मावळमध्ये पक्षाने भाजपमधून आलेल्या सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. सुनील शेळके यांनी भाजपचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. सुनील शेळके यांनी केलेली जोरदार तयारी आणि त्यांचा जनसंपर्क बघून ते विजयी होऊ शकतात असे चित्र आहे.

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीने अतुल बेनके यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ ला जुन्नरमधून मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे हे निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत यंदाची निवडणूक सेनेकडून लढवली. त्यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या शिवसेनेच्या आशा बुचके यांनी अपक्ष उभा राहून त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे मतविभागणित राष्ट्रवादीचे अतुल बेनके सहज निवडून येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खेडमध्ये देखील भाजपच्या बंडखोरामुळे शिवसेनेच्या आमदाराला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्यासमोर भाजपचे बंडखोर अतुल देशमुख रिंगणात आहेत. त्यामुळे मतविभागणी होऊन राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते यांचा विजय होऊ शकतो अशी शक्यता आहे.

पिंपरी मतदारसंघ देखील शिवसेनेच्या ताब्यातून निसटण्याची शक्यता आहे. येथे सेनेचे गौतम चाबुकस्वार सध्या विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी त्यांना आव्हान दिले आहे. सिंधी समाजाची मते बनसोडे यांच्याकडे वळल्याने चाबूकस्वारांना विजय कठीण मानला जात आहे.

हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष चेतन तुपे यांना संधी देण्यात आली. येथून भाजपचे योगेश टिळेकर हे आमदार आहेत. या मतदारसंघात मनसेने देखील चांगली लढत दिली असून मतविभाजनाचा फायदा तुपेंना होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मराठा समाजाची एकगठ्ठा मते तुपे यांना मिळावी यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले होते.

याशिवाय खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीला विजयाचा आत्मविश्वास आहे. येथून भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. राष्ट्रवादीकडून नगरसेवक सचिन दोडके यांना उमेदवारी दिली. त्यांनी चांगली लढत दिल्याची चर्चा आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *