पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार! निवडून येणार तब्बल ‘एवढ्या जागा’

विधानसभा निवडणुकीचं मतदान काल पार पडलं सगळ्यांना आता निवडणुकीच्या निकालांची उत्सुकता लागली आहे. मतदान पार पडल्यानंतर लगेचच सर्वच वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दाखवले. या एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसून येत आहे.

विविध एक्झिट पोलनी दर्शविलेला आकडेवारीनुसार भाजप शिवसेना महायुतीच्या १६६-२४० जागा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाआघाडीला मात्र यावेळेस देखील निराशाच पदरी पडणार असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत आहे. महाआघाडीच्या जागा या ४०-८० पर्यंत राहू शकतात असे यामध्ये सांगण्यात आले आहे.

आजतक-एक्सिस इंडिया यांच्या सर्व्हेनुसार महायुतीला १६६-१९४ जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. या पोलमध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ७२ ते ९० जागा मिळेल असा अंदाज दिला आहे. पण शिवसेनेला या पोलमधून ५७ ते ७० जागा निवडून येतील असं सांगण्यात आलं आहे.

महाआघाडीने या निवडणुकीत चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी राज्यभर प्रचारसभा घेत महाआघाडीसाठी चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीला चांगली कामगिरी करता येईल असे चित्र दिसत होते.

२०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला. त्यानंतर परिस्थिती बदलत गेली. विरोधकांवर दरम्यानच्या काळात अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अनेकांच्या ईडी चौकशी झाली. या निवडणुकीत अनेक मुद्दे गाजले. काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांची भाजप सेनेत मेगाभरती झाली. त्यामुळे अनेक बालेकिल्ल्यात काँग्रेस राष्ट्रवादीला भगदाड पडले.

महाआघाडीचा पश्चिम महाराष्ट्रात चांगला कमबॅक-

महाराष्ट्रात एकीकडे महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना पाहायला मिळत आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळताना दिसत आहे. अनेक दिग्गजांनी पक्षांतर करूनही पश्चिम महाराष्ट्राची जनता यावेळेस आघाडीच्या पारड्यात वजन पडणार असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत आहे.

आजतक एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेला २२ जागा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला २९ जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच या पोलच्या आकडेवारीनुसार मुंबईतील ३६ जागांपैकी ३० जागांवर शिवसेना-भाजपाला यश मिळताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला मुंबईत ३ जागा तर अन्य जागांवर ३ जणांना संधी मिळेल अशी शक्यता आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *