नारायण राणेंचा पराभव केलेल्या शिवसेनेच्या ‘या महिला आमदाराची’ पक्षातून हकालपट्टी!

विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान अवघ्या 2 दिवसांवर आलं आहे. शिवसेना भाजपची महायुती झाल्यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. काही जागांवर बंडखोरी शमविण्यात दोन्ही पक्षांना काही प्रमाणात यश आलं असलं तरी अद्यापही काही जागांवर बंडखोरी कायम आहे. या बंडखोरीचा फटका भाजप-सेनेला मोठ्या प्रमाणात हाेण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातच बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी मागे घेतली नाही. याच कारणास्तव बंडखोर तृप्ती सावतं यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

तृप्ती सावंत यांचं तिकीट नाकारून मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि निकटवर्तीयांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यांनी आपली बंडखोरी कायम ठेवल्याचे विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

कोण आहेत तृप्ती सावंत?

तृप्ती सावंत या दिवंगत शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात त्या शिवसेनेच्या विद्यमान आमदार होत्या. यंदा त्यांना उमेदवारी नाकरण्यात आल्याने आपल्यावर अन्याय झाला असल्याची त्यांची भावना आहे.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये पहिल्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम होतं. २०१४ मध्ये ते भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून दुसऱ्यांदा आमदार बनले.

बाळा सावंत यांचे २०१५ मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरुद्ध त्यावेळी काँग्रेसने नारायण राणे यांना उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीमध्ये तृप्ती यांनी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता.

तृप्ती सावंत यांनी राणे यांचा १९ हजार आठ मतांनी दणदणीत पराभव केला होता. राणे निवडणूक लढवत असल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. राणे यांनी आपली पूर्ण टाकत या निवडणुकीत लावली होती. तृप्ती सावंत यांनी त्यानंतरही दणदणीत विजय मिळवला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *