निकाल तर लांब पण मतदानाआधीच मुख्यमंत्र्याकडून ‘या’ ४ नव्या मंत्र्यांच्या नावाची घोषणा

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर २४ ऑक्टोबरला निकाल आहे. भाजप शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा बहुमत मिळेल असा विश्वास आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने देखील महायुतीसमोर चांगले आव्हान निर्माण करत सत्तापरिवर्तनाचा दावा केला आहे.

महायुतीची घोषणा होण्यापूर्वी सेना स्वतंत्र निवडणूक लढवेल असे चित्र होते. उद्धव ठाकरे आणि सेना नेत्यांनी वेळोवेळी सेनेचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केले. पण युती झाली आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील यावर शिक्कामोर्तब झाले. स्वतः मोदींनी याबद्दल सभेत देवेंद्रच राज्याचे नेतृत्व करतील असे घोषित केले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात महाजानदेश यात्रा काढून मतदारांपर्यंत पोहचण्याचा चांगला प्रयत्न केला. मुख्यमंत्री सध्या राज्यभरात प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी राज्यात सभांचा धडाका लावला आहे. भाजपला राज्यात बहुमताने सरकार येईल असा विश्वास आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत भाजपला १२२ जागांवर विजय मिळेल तर ४० जागांवर टफ फाईट होईल असे सांगितले आहे.

मतदानाआधीच मुख्यमंत्र्याकडून ‘या’ 4 मंत्र्यांच्या नावाची घोषणा-

मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येईल यावर चांगलाच आत्मविश्वास आहे. त्यांनी मतदानाआधीच 4 मंत्र्यांच्या नावाची घोषणा करून टाकली आहे. यामध्ये ३ नव्या चेहऱ्यांना त्यांनी समावेश केला आहे. तर एका विद्यमान मंत्र्यांचे पुन्हा एकदा मंत्री म्हणून नाव घोषित केले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळणार याच विश्वासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात या मंत्र्यांची नावे घोषित केली आहेत. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या नावांमध्ये राम शिंदे हे एकमेव विद्यमान मंत्री आहेत. कर्जत जामखेडमध्ये प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा मंत्री बनवणार असल्याची घोषणा केली. महत्वाचे म्हणजे राम शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार यांचे आव्हान आहे. भाजपच्या सर्व्हेत राम शिंदे यांना विजय कठीण असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले दुसरे मंत्रिपद हे काँग्रेसमधून भाजपवाशी झालेल्या जयकुमार गोरेंना मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपाकडून याठिकाणी जयकुमार गोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेने त्यांचेच बंधू शेखर गोरे यांना उमेदवारी दिली आहे. दोघांना अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांचे आव्हान आहे.

पुसद मतदारसंघातून भाजपाकडून निलय नाईक यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना विजयी करा मंत्री बनवू असे मुख्यमंत्र्यांनी सभेत सांगितले.

त्याचसोबत नाशिकच्या चांदवडचे भाजप उमेदवार राहूल आहेर यांनाही मंत्री बनवू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. चांदवडमध्ये राहुल आहेर यांना काँग्रेसच्या शिरीष कोतवालांचं आव्हान असणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *