राष्ट्रवादीच्या प्रचारसभा गाजवणारे हे मिटकरी नेमके आहेत तरी कोण ?

महाराष्ट्र्रात सुरु असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नेते प्रचारासाठी सभा घेत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. स्टार प्रचारकांच्या फौजा जागोजागच्या मतदारसंघात धडका देत आहेत. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये एक चेहरा आक्रमकपणे सरकारच्या कामगिरी विरोधात बोलताना दिसत आहे. भाजप सेनेच्या नेत्यांच्या आवाजाची मिमिक्री करत त्यांच्या मुद्द्यांची खिल्ली उडवताना दिसत आहे.

कोण आहे हा राष्ट्रवादीच्या सभांमध्ये दिसणारा फर्डा वक्ता ?

राष्ट्रवादीच्या विधानसभा उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये दिसणाऱ्या या वक्त्याचे नाव अमोल मिटकरी आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पदावर काम करतात. अकोला जिल्ह्यातील कुटासा हे मिटकरी यांचे मूळ गाव आहे.

पूर्वी चरितार्थासाठी घरची शेती आणि किराणा मालाचे दुकान चालवत असतानाच मिटकरींनी वक्तृत्वकलेत कौशल्य मिळवले. १२ जानेवारी २०१२ च्या सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमात मिटकरींनी जबरदस्त भाषण करुन आपल्या वक्तृत्वाची छाप निर्माण केली.

संभाजी ब्रिगेडमध्ये मिळाला प्लॅटफॉर्म

संभाजी ब्रिगेडच्या संपर्कात आल्यानंतर मिटकरींना मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. प्रबोधनपर कार्यक्रमांमधून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींना महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नेले. पुढे मिटकरींची संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्तापदी निवड झाली.

त्यांनी आपल्या भाषणातून संभाजी ब्रिगेड, इतिहास, अंधश्रद्धा, लोकशाही, आरएसएस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आक्रमक भाषणे केली. त्यांच्या भाषणांचे व्हिडीओ प्रचंड गाजायला लागले. संभाजी ब्रिगेड नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतर अमोल मिटकरींची प्रदेश संघटक म्हणून नियुक्ती झाली.

संभाजी ब्रिगेड ते राष्ट्रवादी काँग्रेस

संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत मतभेद झाल्यानंतर अमोल मिटकरींनी पूर्वीच्या संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेत प्रवेश केला. संभाजी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला.

त्यानंतर अमोल मिटकरींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अमोल मिटकरींना प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्त केले. संभाजी ब्रिगेडच्या मुशीतून तयार झालेले अमोल मिटकरी आज राष्ट्रवादीच्या सभा गाजवत आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *