नार्को टेस्ट म्हणजे काय आणि ती कशी केली जाते?

पोलिस विभागात एक म्हण प्रसिद्ध आहे, “पोलिसांच्या मारासमोर मुका सुद्धा घडाघडा बोलायला लागतो !” मी मी म्हणणारे गुन्हेगार पोलिसांच्या माराला घाबरून आपले गुन्हे कबुल करतात. पोलिसांच्या “थर्ड डिग्री”चे सगळ्याच गुन्हेगारांना भय असते. पण ही म्हण कधीकधी खरी ठरत नाही.

अशा परिस्थितीत पोलिस इतर पद्धतींचा अवलंब करतात. अशाच एका पद्धतीमध्ये नार्को टेस्टचा समावेश आहे. आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला नार्को टेस्ट म्हणजे काय आणि ती कशी केली जातेयाबद्दल सांगणार आहोत.

नार्को टेस्ट म्हणजे काय?

नार्को टेस्ट ही अशी चाचणी असते, जी आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी केली जाते. ही चाचणी फॉरेन्सिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितीत केली जाते. या चाचणीत आरोपीस काही औषधे दिली जातात, ज्यामुळे त्याचे जागृत मन सुस्त अवस्थेत जाते. त्यामुळे आरोपीच्या कानावर पडणाऱ्या गोष्टींविषयी विचार करुन उत्तर देण्याचे त्याचे कौशल्य कमी होते.

काही प्रकरणांमध्ये आरोपी बेशुद्धावस्थेत जातो, तेव्हा सत्य जाणून घेता येत नाही. परंतु नार्को टेस्टमध्ये आरोपी प्रत्येक वेळी सत्य सांगतात आणि प्रकरण सोडवले जाईल असे होत नाही. बर्‍याच वेळा आरोपी अधिक हुशार असतात आणि चाचणी करणाऱ्या तपास टीमला देखील चकमा देतात.

नार्को टेस्ट करण्यापूर्वी घेण्यात येणारी काळजी

१) कोणत्याही आरोपीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी त्याची शारीरिक तपासणी केली जाते. आरोपी व्यक्ती आजारी, वृद्ध किंवा शारीरक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्यास ही चाचणी केली जात नाही. २) नार्को टेस्टची औषधे आरोपीचे आरोग्य, वय आणि लिंगाच्या आधारे दिली जातात. बर्‍याच वेळा औषधाच्या जादा डोसमुळे ही चाचणी अपयशी ठरते, म्हणून ही चाचणीपूर्वी बरीच काळजी घ्यावी लागते.

३) बर्‍याच प्रकरणांमध्ये या चाचणीदरम्यान औषधाच्या जादा डोसमुळे आरोपी कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे ही चाचणी बऱ्याच विचारपूर्वक केली जाते.

नार्को टेस्ट कशी केली जाते ?

नार्को टेस्टमध्ये आरोपीला “ट्रुथ ड्रग” नावाचे मनोवैज्ञानिक औषध किंवा “सोडियम पेंटोथल/सोडियम अमाईटल”चे इंजेक्शन दिले जाते. या औषधाचा परिणाम होताच आरोपी अशा अवस्थेत जातो, ज्यात तो पूर्णतः बेशुद्धही नसतो आणि पूर्णतः शुद्धीवरही नसतो.

आरोपीची तार्किक क्षमता कमी होते. त्याची विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे व्यक्ती जास्त किंवा गतीने बोलू शकत नाही. अशा अवस्थेत त्या आरोपीला संबंधित केसविषयी प्रश्न विचारले जातात. अशा अवस्थेत आरोपी सत्य उत्तरे देण्याची जास्त शक्यता असते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *