शाब्बास रे पठ्ठ्या! दुपारी अजित दादांसोबत रॅलीत फिरला मा.आमदार, रात्री भाजपात प्रवेश

राजकारणात कोण काय करेल कधी सांगता येत नाही. यंदाची विधानसभा निवडणूक आजपर्यंतची सर्वात वेगळी निवडणूक म्हणून बघितली जाईल. कारण या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. भाजपने काँग्रेस राष्ट्र्वादीच्या अनेक दिग्गजांना आपल्या गोटात सामील करून त्यांना विधानसभेसाठी तिकीट दिले.

भाजपच्या मेगाभरतीसोबत शिवसेनेतही जोरदार इनकमिंग झाली. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने अनेकांना अमिश दाखवून तर काहींना भीती दाखवून प्रवेश दिल्याची चर्चा आहे. भाजपची हि मेगाभरती निवडणूक अवघ्या ६ दिवसांवर आली असूनही अजून थांबली नाहीये. काल मध्यरात्री पुण्यातील एका दिग्गज माजी आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दुपारी अजित दादांसोबत रॅलीत, रात्री मुख्यमंत्र्यांसोबत-

पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे लाडके सहकारी म्हणून ओळख असलेले वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी काल दुपारी अजित पवार यांची रॅली झाली. या रॅलीत पठारे हे अजित दादांसोबत खांद्याला खांदा लावून टिंगरे यांच्या प्रचारात सक्रिय होते. अचानक त्यांनी संध्याकाळी भाजप आमदार जगदीश मुळीक यांच्या सोबत मुंबईत जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

पुणे महानगरपालिका निवडणूक दोन वर्षांवर आली असल्याने हे प्रवेश होत असल्याचं बोललं जात आहे. कोणाला नगरसेवकपदाची “डबल’ उमेदवारी तर, कोणाला “म्हाडा’पासून अण्णाभाऊ साठे महामंडळापर्यंतची विविध महामंडळे, केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्यांमध्ये स्थान या सारख्या विविध पदांचे आमिष दाखवित शहर भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीला शहरात खिंडार पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण यांनीही काल भाजप प्रवेश करून शिवसेनेला “जय महाराष्ट्र’ केला. गेल्या आठवडाभरात काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, सदानंद शेट्टी, सुधीर जानजोत, खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुरेश कांबळे तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील गोगले, किशोर विटेकर, नारायण गलांडे, लहू बालवडकर आदींनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कोण आहेत बापू पठारे?

बापूसाहेब पठारे हे अजित पवार यांचे लाडके आमदार म्हणून ओळखले जायचे. त्यांना राष्ट्र्वादीने २००७ मध्ये पालिकेत सत्ता आल्यानंतर स्थायी समितीच अध्यक्ष केले होते. राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या वडगाव शेरीमध्ये २०१२ ला योगेश मुळीक हे भाजपचे नगरसेवक बनले. तर २०१४ मध्ये जगदीश मुळीक हे बापू पठारेंना पराभूत करून आमदार बनले.

२०१७ मध्ये भाजपचे इथे जास्त नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपकडे झुकला होता. पण महिनाभरापूर्वी सुनील टिंगरे आणि बापू पठारे यांनी भांडण मिटवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली. पठारे हे नाराज होते पण त्यांनी टिंगरेंच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. काल ते दुपारी रॅलीत देखील होते. पण रात्री अचानक भाजप प्रवेश केल्यामुळे मुळीक यांच्या बाजूने पारडे झुकले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *