शिवसेनेला कसे मिळाले धनुष्यबाण निवडणूक चिन्ह अगोदर होते रेल्वे इंजिन हे चिन्ह…

राज ठाकरेंनी २००६ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेने चांगलीच मते मिळवल्याने त्यासालाच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मनसेला “रेल्वे इंजिन” हे निवडणूक चिन्ह दिले. त्या चिन्हातल्या रेल्वेइंजिनांची दिशा उजवीकडुन डावीकडे होती, त्यावेळी मनसेचे १३ आमदार निवडून आले होते.

२०१२ मध्ये इंजिनाची दिशा डावीकडून उजवीकडे केल्यानंतर मुंबई मनपा निवडणुकीत २७ नगरसेवक निवडून आले. तसेच नाशिक मनपाची सत्ताही मिळाली. पण २०१४ च्या निवडणुकीतील अपयशानंतर पक्षाची दशा बदलण्यासाठी पुन्हा एकदा रेल्वे इंजिनांची दिशा बदलण्यात आली. हे झाले मनसेच्या स्थापनेनंतरच्या रेल्वे इंजिनच्या बाबतीत. पण मनसेच्या आधी रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह शिवसेनेने वापरले होते. पाहूया अपरिचित माहिती…

शिवसेनेला कसे मिळाले धनुष्यबाण निवडणूक चिन्ह

१९८८ मध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडून सर्व राजकीय पक्षांची नव्याने नोंदणी आणि प्रत्येकाला स्वतंत्र निवडणूक चिन्ह देण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाळासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले, “प्रत्येक निवडणुकीत कधी उगवता सूर्य, कोणाला नारळ, कोणाला ढाल-तलवार असा गोंधळ असतो त्या ऐवजी ‘धनुष्यबाण’ हे एकच चिन्ह मिळालं तर फार बरं होईल.” त्यानुसार शिवसेनेचे तत्कालीन सरचिटणीस सुभाष देसाई, ऍड.बाळकृष्ण जोशी आणि विजय नाडकर्णी असे पदाधिकारी दिल्लीला गेले आणि त्यांनी पक्ष नोंदणीसोबतच पक्षाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवले.

धनुष्यबाणाच्या आधी रेल्वे इंजिनच्या चिन्हावर शिवसेनेने लढवली होती निवडणूक

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दादरच्या एका जुन्या शिवसैनिकाने शेअर केलेला फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो शिवसेनेला “धनुष्यबाण” हे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळण्याआधीच्या (नक्की साल माहित नाही) विधानसभा निवडणुकीतील आहे. या फोटोत शिवसेना उमेदवाराच्या (बहुदा मनोहर जोशीच असावेत) प्रचारसभेसाठी स्टेजवर बाळासाहेब ठाकरे, शाखाप्रमुख अविनाश ठाकूर, बाळासाहेबांचे पीए वरळीकर आदि लोक दिसत आहेत.

मनोहर जोशी भाषण देत आहेत. या सभेच्या पाठीमागे जो बॅनर लावला आहे त्यावर रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह दिसत आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर मनसेची निशाणी म्हणून हेच रेल्वे इंजिन स्वीकारल्याचे मनसैनिक अभिमानाने सांगतात.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *