मुंबई येथील भिकाऱ्याची संपत्ती निघालेले पैसे बघून पोलीसही हैराण झाले..

मुंबईत रेल्वेखाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या एका भिकाऱ्याची संपत्ती बघून पोलिसांसह अनेक जण चक्रावून गेले आहेत. आझाद हे मागील बऱ्याच महिन्यांपासून ट्रेन मध्ये भीक मागायचे. या घटनेनंतर वाशी सरकारी रेल्वे पोलीस विभागाने (Vashi GRP) आझाद यांच्याबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली, पण या तपासात जे उघडकीस आले ते ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

गेल्या शुक्रवारी बिरादीचंद आझाद यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला जातो आहे. त्यांचा मुलगा राजस्थानमध्ये राहतो, अशी माहिती मिळाली आहे. बिरादीचंद आझाद हे हार्बर रेल्वे मार्गावर भिकारी म्हणून लोकांकडून पैसे गोळा करायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही या प्रकरणात चौकशी करीत गेल्यावर बिरादीचंद आझाद यांच्या झोपडीपर्यंत पोहोचलो. त्यांच्यासोबत त्याचे कोणीही नातेवाईक राहात नव्हते, असे त्यांच्या शेजाऱ्यांनी आम्हाला सांगितले. मग आम्ही त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन तपास केल्यावर ही माहिती समोर आली.

पोलिसांना ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या आझाद यांच्या नावावर बँकेत तब्बल 8.77 लाख रुपयांच्या एफडी आणि 96 हजार रुपयांची नाणी असल्याचे समजले आहे. इतकेच नव्हे तर गोवंडी येथे त्यांच्या राहत्या झोपडीत सुद्धा 1.75 लाख रुपयांची नाणी सापडली आहेत.

झोपड्याची तपासणी करताना पोलिसांना मोठमोठया चार डब्ब्यात 1, 2, 5, 10 रुपयांची नाणी प्लास्टिकच्या पिशवीत टाकून लपवलेली आढळली. शनिवारी दुपारी पोलिसांनी ही नाणी मोजायला घेतली आणि यांची किंमत तब्बल पावणे दोन लाख रुपये असल्याचे समोर आले. इतकी मोठी रक्कम पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

यानंतर पोलिसांनी झोपड्याची पुन्हा झडती घेतली, ज्यामध्ये त्यांना आणखीन एक लपवून ठेवलेला डब्बा आढळला ज्यामध्ये आझाद यांच्या नावे पॅन कार्ड, आधार कार्ड व ज्येष्ठ नागरिक कार्ड ही सर्व कागदपत्रे सापडली.

हा आहे संपत्तीचा वारसदार

यासोबतच पोलिसांना बँकेचे फिक्स डिपॉझिट व पासबुक सारखी कागदपत्रे देखील आढळली यावरून त्यांना आझाद यांच्या नावे 8.77 लाखांच्या एफडी आणि 96,000 रुपये असल्याचे समजले. या सर्व मालमत्तेच्या वारसदारीमध्ये आझाद यांनी स्वतःचा मुलगा सुखदेव याचे नाव दिले होते.

दरम्यान, पोलिसांनी आझाद यांच्या मुलाचा तपास सुरु केला आहे. आझाद हे राजस्थानचे रहिवाशी असून रामगड येथे त्यांचे कुटुंब आहे. याबाबत शेजार्यांना देखील काहीच माहित नसल्याने आझाद आणि त्यांची मालमता हा सर्वांसाठीच मोठा धक्का असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *