देशाच्या राजकारणात गाजलेला बीडचा “हाबाडा” शब्द कसा आला ?

निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारावर शाब्दिक हल्ले करुन त्याला जेरीस आणणे हा राजकारणाचा एक भाग असतो. त्यासाठी त्या उमेदवारावर वैयक्तिक किंवा त्याच्या वागण्या बोलण्याच्याच्या पद्धतीवर टीका करुनही त्याला बंबाळ करणायचा प्रयत्न केला जातो. यातूनच निवडणुकांतील अनेक आठवणीत राहणारे प्रसंग निर्माण होतात. त्यापैकीच बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे दिवंगत नेते बाबुराव आडसकर यांचा “हाबाडा” देशभरात गाजला होता. स्वतः इंदिरा गांधींनी सुद्धा याची दाखल घेतली होती. पाहूया एक राजकीय आठवण…

काय होता तो बीडच्या राजकारणातील हाबाडा ?

१९७२ च्या विधानसभा निवडणुकीवेळचा हा प्रसंग आहे. त्यावेळी काँग्रेस सरकार सत्तेत होते. असे असले तरी बीड जिल्हा मात्र कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव असणारा जिल्हा होता. त्या निवडणुकीत काँग्रेसने बाबुराव आडसकर यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या बापूसाहेब काळदाते ज्यांनी १९६७ च्या निवडणुकीत सहकारमंत्र्यांचा पराभव केला होता, त्यांचे आव्हान होते. पण आडसकरांनी आपल्या खास बीडच्या गावरान रांगडी भाषेत प्रचाराचा धुराळा उडवला.

“यंदा हाबाडा देणारच” अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. अत्यंत अवघड वाटणाऱ्या निवडणुकीत बाबुराव आडसकरांनी विजय संपादन केला. बाबुराव निवडून विधानसभेत गेल्यानंतर त्यांना पत्रकारांना “काळदाते कसे पराभूत झाले ?” असा प्रश्न विचारताच आडसकरांनी तात्काळ सांगितले, “दिला हाबाडा” असे उत्तर दिले. तेव्हापासून हाबाडा हा बीडच्या राजकारणातील शब्द देशभर गाजला.

रशियन तरुणी जेव्हा बाबुरावांच्या मिशांवर भाळली

शरद पवार मुखमंत्री असताना विधानसभेतील सदस्यांचे एक शिष्टमंडळ रशियाला जाणार होते. पवारांनी आडसकरांना रशियाला जाण्याबाबत विचारले असता त्यांनी “आपल्याला कशाला बाबा रशिया बिशिया” म्हणत नकार दिला. पण पवारांनी त्यांना रशियाला जाण्यासाठी राजी केले. स्वतः पवारांनी धोतरवाल्या आडसकरांसाठी रशियाच्या स्टॅलीनप्रमाणे एक पंत शर्ट शिवून घेतला. स्टालिनसारखा वेष घालून आडसकर रशियाला गेले.

त्यांच्या पिळदार मिशा, धोतर, टोपी असा वेष पाहून लोक आश्चर्यचकित झाले. मॉस्कोतील विद्यापीठात तर एका रशियन युवतीने त्यांना “स्टॅलीन स्टॅलीन” म्हणत चक्क आडसकरांच्या पिळदार मिशांचा मुकाच घेतला. रशियाचा दौरा करून आडसकर महाराष्ट्रात आल्यावर पवारांना भेटले आणि म्हणाले “साहेब, लाजा सोडल्या आहेत लोकांनी !” हा किस्सा स्वतः पवारांनी बीडमधील एका कार्यक्रमात सांगितला.

बीडचा छोटा हबाडा

बीड जिल्ह्यात आडसकर आणि हाबाडा हे शब्द सामानार्थीच मानले जातात. एप्रिल २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी बाबुराव आडसकरांचे पुत्र रमेश आडसकर राष्ट्रवादीकडून उभे होते. त्यांचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी धारूर तालुक्यातून येणाऱ्या समर्थकांच्या प्रत्येक गाडीच्या मागच्या काचेवर गावाचे नाव टाकून पुढे हाबाडा शब्द लिहला होता. पण एका गाडीच्या काचेवर “छोटा हाबाडा” लिहण्यात आले होते. त्याचा अर्थ विचारला तेव्हा त्या गाडीवाल्याने सांगितले, रमेशराव हे बाबुरावांचे छोटे पुत्र असल्याने त्यांच्यासाठी “छोटा हाबाडा !”

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *