उदयनराजेंच्या विरोधात आघाडीकडून उमेदवारी निश्चित झालेले श्रीनिवास पाटील कोण आहेत?

सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात आता लोकसभेसाठी पोटनिवडूक होत आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच हि पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात आघाडीकडून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. खासरेवरून जाणून घेऊया कोण आहेत श्रीनिवास पाटील..

सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचं गाव पाटण तालुक्यातील मारुल हवेली या गावचा हा सुपुत्र. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला. बालपण खूप समृद्धीत गेलं. लहानपणीच थोरामोठ्या माणसांचा सहवास मिळाला. कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिह नाना पाटील यांच्या अंगाखांद्यावर खेळण्याची संधी मिळाली. पुढे शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगीळ यांच्या मायेच्या सावलीत वाढले. पुढे कलेक्टर झाले.

ते खासदार झाले तो एक योगायोग आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची पक्षाची निर्मिती केल्यावर कराड लोकसभा मतदारसंघात तत्कालीन खासदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. ही निवडणूक लक्षवेधी होती.

कराड हा चव्हाण कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण,आई प्रेमीलाकाकी चव्हाण यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचा टिकाव लागेल काय?अशी चर्चा होती. पण पाटील यांनी गावोगावी प्रचारसभातून केलेली रांगडी भाषणे लोकांना भावली.

सनदी सेवेत काम केलेला हा माणूस रांगडेपणा विसरला नाही, तो अजूनही खास कराड-वाळव्याची म्हणून असलेली भाषा बोलतो. याच लोकांना कौतुक वाटत होतं. हा माणूस नुसता मतं मागायला आला नव्हता तर भाषणातून सातारा सांगली जिल्ह्याचा इतिहास मांडत होता. जुन्या आठवणी जागवत होता. कधी कुस्तीचे किस्से,कधी तमाशातील गोष्टी,कधी शेतीच्या बांधावरचे निखळ विनोद सांगून हा उमेदवार लोकांशी बोलत होता.

अनेक वर्षाचा तुटलेला सवांद साधत होता. मतदारसंघात फिरताना त्यांच्या मनावर निवडणुकीचा ताण जाणवत नव्हता. दिलखुलासपणे फिरत होता. लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांचं वाटेगाव कराड मतदारसंघात होत, तिथं गेल्यावर श्रीनिवास पाटील यांनी भाषणात ‘माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली’ही लावणी म्हणून आण्णाभाऊंची महती सांगितली. रेठरे हरणाक्ष गावात गेल्यावर पट्टे बापूराव यांच्या आठवणी जागवल्या. निवडणूक हा विषय दूर राहिला होता. सुरू होता सवांद..

शेवटी या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत पाटील विजयी झाले. ते खासदार झाले. त्यानंतर ते नेहमी लोकांच्यात राहिले. लोकांसाठी काम करत राहिले. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिले.कुस्त्याची मैदाने,गावच्या जत्रातुन लोकांशी संपर्क ठेवू लागले. जमीनीवर बसून कार्यकरत्यासोबत पत्रावळीवर बसून जेवण करत.

ते दोन वेळा खासदार झाले. याकाळात त्यांची साधी राहणी मला पहाता आली आणि भाषणे मला ऐकता आली. कधी खूप गडबड असेल तर ते लग्नात जेवायला थांबत नसतं पण तिथली जेवणाची शिदोरी बांधून घेत. ती गाडीत खात आणि फोन करून आवडली असही संबंधित लग्न मालकाला कळवत.

जुलै २०१३ मध्ये श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमचे राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. ऑगस्ट २०१८ पर्यंत ते सिक्कीमचे राज्यपाल होते. मारुल ते सिक्कीमची राजधानी गंगटेक हा एका शेतकरी कुटूंबातील माणसाचा प्रवास आहे. आणि ते इतक्या मोठ्या पदावर गेले तरी ते तसेच आहेत. त्यांच्यातील रांगडेपणा आजही जाणवतो आणि भावतो.
संपत मोरे 9422742925

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *