आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या रिक्षावाल्याला पोलिसांनी ठोठावला १८ हजार दंड, त्याने केला..

१ सप्टेंबर पासून भारतात नवीन मोटार वाहन कायदा अंमलात आला. हा कायदा अमलात आल्यापासून अनेक ठिकाणी चालकांना मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. एकीकडे काही राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करत बेशिस्त वाहन चालकांना दंड ठोठावला जात आहे.

अनेकदा दंड ठोठावल्याची रक्कम हि लाखांमध्ये असल्याचे समोर आले. एका ट्रक चालकाने तर तब्बल ६ लाख ४३ हजार रुपये दंड भरला होता. तर काही घटना अशा देखील घडल्या ज्यामध्ये दंडाची रक्कम हि त्या गाडीच्या किमतीपेक्षा जास्त होती.

एक घटना तर अशी देखील घडली ज्यामध्ये त्या गाडी वाल्याने दंड आकारल्यानंतर ती गाडी तिथेच जाळून टाकली. दरम्यान गुजरातमध्ये अशीच एक अजून घटना घडली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी रिक्षाचालकाला १८ हजारांचा दंड ठोठावला. एवढा दंड ठोठावल्याने रिक्षाचालकाने आत्मह त्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथे ही घटना घडली आहे. रिक्षाचालकाचं नाव राजू सोलंकी असं आहे. पोलिसांनी राजू सोलंकी यांना १८ हजारांचा दंड ठोठावला होता. दंडाची ही रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने राजू सोलंकी यांनी फि नाइल पिऊन आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ही रक्कम भरणं त्यांना शक्य नाही. दंडाची रक्कम न भरल्याने त्यांची रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान राजू सोलंकी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गुजरातमध्ये सरकारने दंडाची रक्कम ५० टक्के कमी केली आहे. तर महाराष्ट्रात या नवीन कायद्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. गुजरातमध्ये या रिक्षाचालकाला लावलेल्या दंडामुळे लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. रिक्षाचालक हे रोज आपलं पोट भरण्यासाठी रिक्षा चालवून थोडी फार कमाई करतात. पण अशाप्रकारे जर दंड आकारला जात असेल तर त्यांचे कुटुंब कसे जगणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान आपली रिक्षा जप्त करण्यात आली असल्याने आपण कामावरही जाऊ शकत नसल्याचं राजू सोलंकी सांगत आहे. राजू सोलंकी यांचं बी.कॉमपर्यंत शिक्षण झालं आहे. पण नोकरी न मिळाल्याने त्यांनी पोट भरण्यासाठी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *