महाराष्ट्रातील सर्वात युवा सरपंचाला मिळणार राष्ट्रवादीचे विधानसभेचं तिकीट!

राजकारण ही पुरुषांची मक्तेदारी समजली जाते. महिलांमध्येही राजकारण करण्याची प्रचंड क्षमता असते हे भारतीय राजकारणावर छाप पाडणाऱ्या अनेक महिला राजकारण्यांकडे पाहून सांगता येईल.

मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण लागू झाल्यानंतरही कित्येक गावांमध्ये महिला सरपंचाच्या खुर्चीवर त्या महिलेचा पती किंवा मुलगा बसून गावाचा कारभार करत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. गावोगावच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गटबाजी, वादविवाद, हाणामाऱ्या, केसेस असे सर्वसाधारण चित्र पाहायला मिळते. पण खानदेशातील एक गाव याला अपवाद ठरले…

वयाच्या १९ व्या वर्षी कल्पिता पाटील बनल्या गावच्या सरपंच

खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात कल्याणेहोळ नावाचे दोन हजारच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या गावात २०१३ साली झालेली ग्रामपंचायत निवडणूक आगळीवेगळी ठरली. जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालायात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेत शिकणाऱ्या कल्पिता पाटील या तरुणीने ही निवडणूक लढवून विजय मिळवला.

गावाला चांगली दिशा देण्यासाठी चार महिला आणि तीन पुरुष ग्रामपंचायत सदस्यांनी कल्पिता पाटील हिची एकमताने गावची सरपंच म्हणून निवड केली. महाराष्ट्रातील सर्वात युवा सरपंच होण्याचा बहुमान कल्पिता पाटील यांना मिळाला.

सरपंच होताच ग्रामविकास, महिला सबलीकरण, स्त्री भ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, महिला बचत गट अशा विषयांवर काम करुन त्यांनी आपले उच्चशिक्षण गावाच्या प्रगतीसाठी सार्थकी लावले. गावामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणून गावकऱ्यांना त्याच्याशी जोडले. राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावातील अनेक विकासकामे मार्गी लावली.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कल्पितामधील गुण हेरले आणि तिला जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. आपल्या पदाला योग्य न्याय देत कल्पिता पाटील यांनी समाजाच्या विविध प्रश्नांना हात घातला आहे.

कल्पिता पाटील विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात!

राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेते पक्षांतर करुन इतर पक्षात जात असताना स्वतः शरद पवार साहेब महाराष्ट्र दौरा करुन आले. त्यांच्या दौऱ्यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. प्रस्थापित नेते निघून गेल्यामुळे राष्ट्रवादीतील युवा चेहऱ्यांना संधी मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.

अशामध्ये कल्पिता पाटील यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात युवा सरपंच आहेत आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून कल्पित पाटील यांनी केलेल्या कामाची दखल घेतली जाऊन त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *