उदयनराजेंचे आतापर्यंत झालेले पराभव

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या खास स्टाईल आणि डायलॉगसाठी ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बेधडक वक्तव्यांबद्दल ते कायम चर्चेत असतात. पक्ष गेला खड्ड्यात म्हणत माझी जनता हाच माझा पक्ष असल्याचे त्यांचे वक्तव्य ते करत असतात..

त्यामुळे उदयनराजे कुठल्याही पक्षात असले तरी त्यांच्या वैयक्तिक करिष्म्याच्या जोरावर ते निवडून येतात अशी चर्चा लोकांमध्ये ऐकायला मिळत असते. पण लोकांना याची दुसरी बाजू माहित नसते. इतकी वर्ष राजकारणात असणाऱ्या उदयनराजेंनी देखील अनेक पराभव पचवले आहेत. पाहूया त्यांच्या राजकीय जीवनातील पराभवांविषयी…

विजय आणि पराभवासोबत उद्यनराजेंचा राजकारणात प्रवेश

राजघराण्यात जन्माला आलेले उदयनराजे भोसले इंग्लंडमधून एमबीए शिक्षण घेऊन आल्यानंतर १९९१ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपले चुलते अभयसिंहराजे भोसले यांच्या विरोधातच त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभा केला. गंमत म्हणजे या निवडणुकीत उदयनराजेंनी दोन वॉर्डामधून स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला होता.

त्यापैकी एका वॉर्डात ते निवडून आले तर दुसऱ्या वॉर्डात ते पराभूत झाले. अशा पद्धतीने उदयनराजेंच्या राजकारणातील पहिल्यावहिल्या विजयाला पराभावाची किनार लाभली.

उदयनराजेंचा दुसरा पराभव

सातारा नगरपालिकेत १९९१ ते १९९६ अशी पाच वर्ष नगरसेवक राहिल्यानंतर उदयनराजे १९९६ मध्ये पहिल्यांदा सातारा लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष म्हणून निवडणुक लढले. त्यावेळी काँग्रेसकडून प्रतापराव भोसले आणि शिवसेनेकडून हिंदुराव नाईक-निंबाळकर हे उमेदवार रिंगणात होते.

या निवडणुकीत उदयनराजेंना लक्षणीय मते मिळाली, परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र या निवडणुकीत मतांची विभागणी झाल्याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला झाला आणि अवघ्या १२००० मतांनी ते निवडून आले.

उद्यनराजेंचा तिसरा पराभव

मार्च १९९८ मध्ये अभयसिंहराजे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून गेल्यामुळे त्यांच्या विधानसभेच्या मोकळ्या जागेवर पोटनिवडणुक झाली. त्यामध्ये काँग्रेसकडून शिवेंद्रराजे आणि भाजपकडून उदयनराजे अशी लढत होऊन उदयनराजे जिंकले. युतीच्या सरकारमध्ये ते काही काळ महसूल राज्यमंत्रीही झाले. मात्र काही लगेचच सप्टेंबर १९९९ मध्ये विधानसभा निवडणुका लागल्या.

उदयनराजेंविरोधात पुन्हा माजी आमदार अभयसिंहराजे उभे राहिले. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी अभयसिंहराजेंच्या गटाच्या शरद लेवेंचा खून झाला आणि त्यात उदयनराजेंना अटक झाली. निवडणुकीत परिणाम होऊन उदयनराजे पराभूत झाले.

उदयनराजेंचा चौथा पराभव

शरद लेवे खून प्रकरणातून २२ महिने तुरुंगवास भोगून उद्यनराजेंची निर्दोष सुटका झाली. २००१ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा सातारा नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि एकहाती नगरपालिकेवर सत्ता हस्तगत केली. २००४ मध्ये अभयसिंहराजेंचे निधन झाल्यांनतर पुन्हा एकदा सातारा विधानसभेच्या जागेसाठी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे आमनेसामने आले.

जनतेने अभयसिंहराजेंच्या निधनाने सहानुभूतीने शिवेंद्रराजेंना पुन्हा निवडून दिले आणि याही निवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. पुढे शरद पवारांनी उदयनराजेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतल्यानंतर उदयनराजेंनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सातारा लोकसभा निवडणुका जिंकल्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *