उदयनराजेंचं ठरलं! उद्या मोदी शहांच्या उपस्थितीत करणार भाजप प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. मागील काही दिवसात अनेक बड्या नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. आता यामध्ये एक मोठं नाव जोडलं जाणार आहे. ते म्हणजे सातारचे खासदार उदयनराजे भोसले. छत्रपती उदयनराजे भोसले हे आज आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर उदयनराजे दिल्लीला रवाना होणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आज रात्री आठ वाजता राजीनामा सादर करणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्या (ता. १४) होणार आहे. उदयनराजेंनी काल सायंकाळी कार्यकर्त्यांशी बोलून आपला निर्णय त्यांच्याजवळ जाहीर केला होता.

त्यांच्या या निर्णयाची अधिकृत घोषणा त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट टाकून करण्यात आली आहे. राजेंनी राजीनामा दिल्यानंतर सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीसोबत ती होण्याची शक्यता नाही.

उदयनराजे भाजपमध्ये जात असल्याच्या जोरदार चर्चा रंगलेल्या असतानाच काल त्यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.जवळपास २ तास त्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यामुळे ते राष्ट्र्वादीतच राहणार का भाजपात जाणार याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते पक्षांतर करीत आहेत. भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे. खासदार उदयनराजे देखील आता भाजपात जात असल्याने राष्ट्रवादीला सातारा या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. यापूर्वीच सातारचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

साताऱ्यातील अजून एक मोठे नाव असलेले रामराजे निंबाळकर हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार आहे.

खासदारीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजे आग्रही होते. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला विलंब झाला. खासदारकीचा आज राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे यांचा उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *