महाराष्ट्रात बैलपोळ्याप्रमाणेच इथे साजरा होतो गाढवपोळा

आपल्याकडे बैलपोळा हा सण बैलांना समर्पित आहे. वर्षभर मालकासोबत शेतात राबणाऱ्या बैलांची यादिवशी पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा घास भरवला जातो. त्यांना रंग लावून सजवले जाते, गावात त्यांची मिरवणूक काढली जाते.

त्याच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. कृषी परंपरेत या सणाला खूप महत्व आहे. परंतु महाराष्ट्रात बैलपोळ्याप्रमाणेच गाढवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाढवपोळा साजरा केला जातो याबाबदल लोकांना जास्त माहिती नाही. चला तर पाहूया…

काय आहे गाढवांची उपयुक्तता ?

गाढवे वर्षभर पाठीवर भार वाहण्यासोबतच पावसाळ्याच्या काळात रस्ते खराब झाल्यानंतर शेतामध्ये खत वाहून नेण्यासाठी फार उपयोगी असतात. गाढव हा शेतीच्या तसेच इतर कामांसाठी स्वस्तात उपलब्ध होणारा प्राणी आहे. इतर जनावरांप्रमाणेच त्याचा आहार असतो.

गाढवांची विष्ठा शेतीसाठी उत्तम खत असते. कुंभारकामात गाढवाची लीद उपयोगाला येते. गाढवीच्या दुधात प्रचंड रोगप्रतिकारशक्ती असल्याने त्याला फार मागणी असते. इटलीची राणी त्वचा गोरी आणि मुलायम बनवण्यासाठी गाढवीच्या दुधाने अंघोळ करायची अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

कसा असतो महाराष्ट्रातील गाढवपोळा ?

महाराष्ट्राच्या अकोला, अमरावती, सोलापूर जिल्ह्यातील वर्षानुवर्षे गाढवपालन करून उपजीविका करणारे भोई आणि कुंभार समाजातील लोक गाढवांची पूजा करून गाढवपोळा सण साजरा करतात. ज्या गाढवाची आपण त्याच्या मेहनत, कुरूपता आणि बेसुऱ्या आवाजावरून हेटाळणी करतो, त्याच गाढवांना भोई आणि कुंभार समाजाचे लोक अंघोळ घालतात.

विविध नक्षीदार झुले पांघरून आणि रंग लावून त्यांना सजवतात. त्यादिवशी गाढवांना कुठल्याही कामाला जुंपले जात नाही. घरातील मायमाऊल्या त्यांना पुरणपोळीचा घास भरवून त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. हळूहळू शिक्षणामुळे या समाजातील मुलांनी नोकऱ्यांचा मार्ग धरल्याने हा व्यवसाय आणि परंपरा कमी होत चालली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *