मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांनी कुटुंबाला देखील सोडले होते!

भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात किंग्स्टनच्या सबिना पार्कवर सुरु असणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये हनुमा विहारीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. भारतीय प्रमाणवेळेनुसार तेव्हा अर्धी रात्र सुरु होती, पण सबिना पार्कपासून हजारो किमी दूर भारतातील सिकंदराबादमध्ये त्याची ५३ वर्षांची आई विजयालक्ष्मी टीव्हीसमोर नजर डोळा लावून बसली होती.

हनुमाने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. हनुमा बारा वर्षांचा असताना त्याचे वडील हे जग सोडून गेले होते. त्यावेळीच हनुमाने ठरवले होते, ज्यावेळी आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक करेन तेव्हा ते आपल्या वडिलांना अर्पण करेन. हनुमाने हे शतक आपल्या वडिलांना अर्पण केलेले पाहून त्याच्या आईचे डोळे भरून आले.

हनुमासाठी जेव्हा वडिलांनी घराचा त्याग केला

हनुमाला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. त्याचे वडील सत्यनारायण तेलंगणाच्या सिंगरेनीमध्ये एक इंजिनिअर म्हणून नोकरीस होते. आपल्या मुलाच्या क्रिकेटच्या स्वप्नासाठी वाटेल तो त्याग करण्यासाठी ते तयार होते.

त्यांनी तसा त्याग केलाही. हनुमाला क्रिकेटची चांगली ट्रेनिंग मिळावी म्हणून त्याला त्याच्या आई आणि बहिणीसोबत हैद्राबादला पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. स्वतः एकटे राहू लागले. आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या बापाने आपल्या घराचा आणि घरातील लोकांचा केलेला त्याग फार मोठं आहे.

हनुमाने स्वतःला सिद्ध केले

हैद्राबादला आल्यावर सेंट जॉन अकेडमीत हनुमाने प्रवेश घेतला. अंडर-१३, अंडर-१९, आंध्रप्रदेश टीमकडून खेळताना त्याने चांगले प्रदर्शन केले. २०१२ मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता.

२०१४-१५ मध्ये इंग्लंडमध्ये डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळताना सहा शतक झळकावून त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले. ११७ फर्स्ट क्लास सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचा रेकॉर्ड मोडत त्याने ५९.३० च्या एव्हरेजने ६१०८ रन्स केले. आजघडीला फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटर्समध्ये हे सर्वाधिक एव्हरेज आहे.

भारतीय संघात मिळाले स्थान

रणजी सामन्यात उर्वरित भारतीय संघाच्या वतीने खेळताना रणजी चषक विजेता ओडिसा संघाविरुद्ध हनुमाने १८३ धावांची खेळी करून निवड समितीच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले. सप्टेंबर २०१८ मध्ये इंग्लडविरुद्धच्या मालिकेत हनुमा विहारीला भारतीय संघात स्थान मिळाले.

मालिकेच्या पाचव्या सामन्यात त्याचे कसोटी पदार्पण झाले आणि या पहिल्या सामन्यात त्याने ५६ धावा केल्या. भारत तो सामना हरला, पण हनुमाने संघात आपले स्थान पक्के केले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *