राज ठाकरेंची चौकशी होऊन एक दिवस उलटला नाही तोवर मनसेने पाठवली चक्क ईडीला नोटीस!

कोहिनूर मिल जमीन खरेदीप्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कालच चौकशी झाली. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवून राज ठाकरे यांना काल २२ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांची काल जवळपास ९ तास चौकशी झाली.

राज ठाकरे सकाळी साडेदहा वाजता कृष्णकुंज या निवासस्थानावरुन ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील ईडी कार्यालयापर्यंत आले होते. त्यांची चौकशी होईपर्यंत कुटुंबीय ग्रँड हॉटेलमध्ये थांबले होते.

शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणाºया कोहिनूर स्केअर टॉवर या सुमारे २,१०० कोटींच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. या कथित गैरव्यवहारप्रकरणी कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी व अन्य भागीदार राजन शिरोडकर यांची गेले तीन दिवस चौकशी झाली.

त्यानंतर त्यांचे भागीदार असलेले मातोश्री कन्स्ट्रक्शनचे राज ठाकरे यांची काल ईडीने तब्बल ९ तास चौकशी केली. चौकशी झाल्यानंतर त्यांनी कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, ही पहिली प्रतिक्रिया काल दिली होती.

राज यांना ईडीने नोटीस पाठवून अन चौकशी होऊन काही तास उलटले असतानाच आता मनसेने देखील ईडीला नोटीस पाठवली आहे. “महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, त्यामुळे त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्या नोटीसची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार का?”, असे मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करून सांगितले आहे.

राज यांना नोटीस पाठवणाऱ्या ईडीला मनसेने नोटीस पाठवून, मराठीत फलक लावण्याची मागणी केली आहे. मनसेच्या या नोटीसनंतर ईडी कार्यालयावर मराठीत अंमलबजावणी संचालनालय ही अक्षरे झळकणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या ईडी कार्यालयाबाहेर जो फलक आहे, त्यावर हिंदीमध्ये प्रवर्तन निदेशालय असं लिहलं आहे. त्याखाली Enforcement Directorate असं इंग्रजीत लिहिलं आहे.

मनसेने यापूर्वीही बऱ्याचदा मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी आंदोलने केली आहेत. मनसेच्या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात मराठीत पाट्या लागल्याचे चित्र दिसते. आता ईडी देखील मराठीत पाटी लावते का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *