काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले ३८००० सैनिक, रोखण्यात आली अमरनाथ यात्रा! हे आहे कारण..

जम्मू काश्मीरमध्ये १५ ऑगस्ट पर्यंत चालणारी अमरनाथ यात्रा २ ऑगस्टला रोखण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने सध्या ही यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमधील पर्यटकांना काश्मीर खाली करण्यास सांगण्यात आलं आहे. सुरक्षा रक्षकांना अमरनाथ यात्रेच्या रस्त्यालगत एक स्नाईपर गन मिळाली आहे. त्यानंतर ही यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं आहे.

अमरनाथ यात्रेच्या रस्त्यालगत स्नाईपर गन मिळाल्यानंतर यात्रेकरूंवर एखादा मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर परिपत्रक काढून तात्काळ काश्मीर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्य़टकांच्या सुरक्षेच्या कारणास्तवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या लोकांना लवकरात लवकर काश्मीरमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं आहे.

सुरक्षा रक्षक अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या लोकांसाठी दिवसरात्र तैनात असतात. हल्ल्याची दाट शक्यता असल्याने सुरक्षा रक्षकांना हायअलर्टवर ठेवण्यात आलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पोलिसांव्यतिरिक्त ९० हजार इतर सैनिक तैनात आहेत. याशिवाय मागील काही दिवसात काश्मीरमध्ये जवळपास ३८००० नवीन सैनिकांना तैनात करण्यात आलं आहे.

याशिवाय काश्मीर खोऱ्यात एअरफोर्सला देखील हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रीय रायफल आणि सैन्याच्या दुसऱ्या काही तुकडयांना देखील LOC आणि सीमारेषेजवळ तैनात केले जात आहे. दहशतवाद पूर्णपणे संपवणे हा यामागचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय ग्रहराज्यमंत्री कृष्ण रेड्डी यांनी राज्यसभेत २४ जुलै रोजी सांगितले होते कि जम्मू काश्मीर मधील स्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे. जानेवारी २०१९ पासून जुलै पर्यंत १२६ दशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे किंवा पकडण्यात आले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिक काश्मीरमध्ये पाठ्वण्यामागे काय आहे कारण-

काश्मीरमध्ये स्थिती सुधारल्याचे सांगितल्यानंतर देखील या नवीन ३८००० सैनिकांना काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले आहे. यामागे अनेक तर्क लावले जात आहेत. काश्मीरचा विशेष राज्याच्या दर्जा काढला जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर परिस्थिती चिघळू शकते. त्यामुळे अगोदरच खबरदारी म्हणून सैनिकांना तैनात केले जात असल्याचं बोललं जात आहे.

यावर अजून एक तर्क लावला जात आहे. १५ ऑगस्टला जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येक पंचायत मध्ये तिरंगा फडकावला जाणार आहे. यादरम्यान दहशतवादी काही कृत्य करू नाही म्हणून अतिरिक्त सैनिकांना तैनात केल्याचं बोललं जात आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *