काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या ७ मोठ्या नेत्यांनी केला आज भाजपमध्ये प्रवेश!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होत्या. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून आज भाजपमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या ७ मोठ्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपच्या इतर मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला आहे.

या सात मोठ्या नेत्यांसह अनेक नगरसेवक सभापती व मोठ्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपाचे प्रमुख नेते हजर आहेत

प्रवेश करणाऱ्या नेत्यांसोबत त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गरवारे क्लब येथे गर्दी केली होती. कालच राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अकोलेचे आमदार वैभव पिचड, नवीन मुंबईतील बेलापूरचे आमदार संदीप नाईक तसेच काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला होता.

या ४ आमदारांनी राजीनामा दिल्याने त्यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात होता. पण त्यांच्यासोबत अजून कोण कोण प्रवेश करणार याविषयी चर्चा सुरु होत्या. भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ७ मोठ्या नेत्यांनी आज प्रवेश केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड, शिवेंद्रसिंहराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या महत्वाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासह संजीव नाईक यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.

कोळंबकर हे पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याचे मागील ७-८ महिन्यांपासून बोलले जात होते. आज त्यांनी अधिकृत प्रवेश केला. गणेश नाईक हे जरी अधिकृतपणे आज भाजपात गेले नसले तरी त्यांच्या दोन्ही मुलांच्या भाजप प्रवेशाने ते देखील भाजपवासी झाल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री राहिलेले गणेश नाईक हे नवी मुंबईच्या सर्व नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात होते. आज आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत किती नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे याचा अधिकृत आकडा अजून समोर आलेला नाहीये.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *