वर्ल्डकप जिंकलेल्या इंग्लंडला बक्षीस म्हणून मिळाले ‘एवढे’ कोटी!

लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा थरारक पराभव करत विश्वविजेतेपदावर पहिल्यांदा नाव कोरले. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी नशिबाची मोठी साथ मिळाली. अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडशी बरोबरी साधली. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडनेही बरोबरी साधली, मात्र सामन्यात सर्वाधिक चौकार मारलेले असल्यामुळे यजमान इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा विश्वचषक यजमान देशाने पटकावला आहे. याआधी भारत (२०११) आणि आॅस्टेÑलिया (२०१५) यांनी यजमान म्हणून विश्वविजेतेपद जिंकले होते. या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडने त्यांना ५० षटकांत ८ बाद २४१ धावांवर रोखले. यानंतर इंग्लंडलाही ५० षटकात २४१ धावांत गुंडाळून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १५ धावा फटकावल्या. न्यूझीलंडकडून या लक्ष्याचा पाठलाग करताना जेम्स नीशामने जबरदस्त फटकेबाजी केली पण शेवटच्या चेंडूवर गुप्टिल रनआऊट झाला आणि सुपरओव्हरमध्ये देखील सामना बरोबरीत सुटला. आणि इंग्लंच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

इंग्लंडला बक्षीस म्हणून मिळाले एवढे कोटी-

या स्पर्धेत जवळपास ६९ कोटी ४० लाख रुपयांची बक्षिसे वाटली गेली. त्यामध्ये विजेत्या इंग्लंड संघाला जवळपास २७ कोटी ७५ लाख रुपये तर उपविजेत्या न्यूझीलंड संघाला १३ कोटी ९० लाख रुपये बक्षीस मिळाले.

१९७५ पासून २०१९ पर्यंत वर्ल्ड कप विजेत्यांना किती रक्कम मिळाली- (१९७५ ते २००७ पर्यंतच्या वर्ल्ड कपमधील बक्षिसांच्या रक्कमा आजच्या तारखेच्या पौंड किंवा डॉलरच्या मुल्यानुसार कन्व्हर्ट केल्या आहेत.)

१) १९७५ – पहिला वर्ल्ड कप १९७५ साली इंग्लडमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यात संपूर्ण स्पर्धेसाठी एकूण ७ लाख ७५ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. विजेत्या वेस्ट इंडिज संघाला ३ लाख ४४ हजार रुपये तर उपविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला १ लाख ७२ हजार रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली.

२) १९७९ – १९७९ सालचा वर्ल्डकप इंग्लंडमध्येच आयोजित करण्यात आला होता. त्या विश्वचषकात एकूण २२ लाख ३१ हजार रुपयांची बक्षिसे होती. विजेत्या वेस्ट इंडिज संघाला ८ लाख ६१ हजार रुपयांचे तर उपविजेत्या इंग्लंड संघाला ३ लाख ४४ हजार रुपये बक्षीस देण्यात आले.

३) १९८३ – १९८३ साली इंग्लंडने पुन्हा एकदा वर्ल्ड कपचे आयोजन केले होते, ज्यात भारतीय संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. या वर्ल्ड कपमध्ये एकूण ५७ लाख रुपयांची बक्षिसे होती. त्यात विजेत्या भारतीय संघाला १७ लाख २३ हजार रुपये तर उपविजेत्या वेस्टइंडीज संघाला ८ लाख ६१ हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.

४) १९८७ – भारत आणि पाकिस्तान यांच्या वतीने संयुक्तरित्या १९८७ चा वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. त्यात जवळपास ८५ लाख ५८ हजार रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षीस वाटण्यात आली. विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला २५ लाख ८५ हजार रुपयांचे तर उपविजेत्या इंग्लंड संघाला १२ लाख ९२ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.

५) १९९२ – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त वतीने १९९२ साली वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. त्यात जवळपास १ कोटी रुपयांहून अधिक रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. विजेत्या पाकिस्तान संघाला १७ लाख ६७ हजार रुपयांचे तर उपविजेत्या इंग्लंड संघाला ८ लाख ८३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

६) १९९६ – भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनात १९९६ ची विश्वचषक स्पर्धा पार पडली. एकूण स्पर्धेत १ कोटी ७२ लाख रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षिसे वाटण्यात आली, त्यात विजेत्या श्रीलंका संघाला २५ लाख ८६ हजार रुपयांचे तर उपविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला १२ लाख ९३ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.

७) १९९९ – १९९९ साली परत एकदा इंग्लंडला विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत एकूण ६ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षिसे वाटण्यात आली, त्यात विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला २ कोटी ५ लाख रुपयांचे तर उपविजेत्या पाकिस्तानला १ कोटी २ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.

८) २००३ – दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनियाच्या संयुक्त वतीने २००३ ची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत २५ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला जवळपास १३ कोटी ७२ लाख रुपये तर उपविजेत्या भारतीय संघाला ५ कोटी ४९ लाख रुपये रक्कमेचे बक्षीस मिळाले.

९) २००७ – २००७ चा वर्ल्ड कप वेस्टइंडीजमध्ये पार पडला. या स्पर्धेत ३४ कोटी ३० लाख लाख रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षिसे प्रदान करण्यात आली. विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला जवळपास १५ कोटी ३७ लाख रुपयांचे तर उपविजेत्या श्रीलंका संघाला ६ कोटी ८६ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

१०) २०११ – भारत, श्रीलंका आणि बांगलादेशच्या वतीने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास ५० कोटी रुपयांची बक्षिसे दिली गेले. विजेत्या भारतीय संघाला जवळपास २२ कोटी ३० लाख रुपयांचे तर उपविजेत्या श्रीलंकेला १० कोटी २९ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.

११) २०१५ – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या वतीने २०१५ च्या वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास ६५ कोटी रुपयांची बक्षिसे वाटण्यात आली. विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला २५ कोटी रुपये तर उपविजेत्या न्यूझीलंड संघाला १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *