३० वर्षांपूर्वी घेतलेले उसने पैसे परत करण्यासाठी “तो” केनियाचा खासदार चक्क औरंगाबादला आला

जगाच्या पाठीवर आर्थिक नड कुणाला नसते ? आणि तात्काळमध्ये जर अशा पैशांची गरज असेल तर मग उसनवारी करण्याशिवाय माणसाकडे पर्याय उरत नाही. अशावेळी नातेवाईक किंवा मित्रांकडून उसने पैसे घेतले जातात. काहीजण ते परत करतात तर काहीजण बुडवतात. त्यातूनच कधीकधी नात्यांमध्ये दुरावाही येतो.

पण आपल्याकडे एक नुकतीच एक घटना घडली आहे, ज्यात ३० वर्षांपूर्वी घेतलेले कर्ज परत करण्यासाठी चक्क केनियामधील खासदार भारतात औरंगाबादला आला होता. केनियाच्या खासदाराचा आणि औरंगाबादमधून उसने पैसे घेण्याचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हे नक्की वाचा…

केनिया आणि औरंगाबादच्या व्यक्तींमधील उसन्या पैशांचा व्यवहार नक्की आहे तरी काय ?

त्याचे झाले असे की रिचर्ड टोंगी नावाचा एक विद्यार्थी १९८५-८९ दरम्यान औरंगाबादच्या एका स्थानिक कॉलेजमध्ये मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यावेळी आपल्या मायदेशी परत जाण्यापूर्वी त्याने औरंगाबादमधील काशिनाथ वानखेडे यांच्याकडून २०० रुपये उसने घेतले होते. त्याकाळी गवळी हे वानखेडेनगर भागामध्ये रेशनिंग दुकान चालवत होते.

रिचर्ड टोंगी त्याच भागात राहून शिकत होता. आपल्यासारख्या अनोळखी आणि परदेशी मुलाला मदत केल्याबद्दल रिचर्डने गवळी कुटुंबियांचे आभार मानले आणि आपण हे पैसे त्यांना परत करणार असा शब्द त्याने दिला होता.

रिचर्ड खासदार झाल्यावर गवळी कुटुंबियांचे येऊन पैसे परत करण्यासाठी भारतात आले

गवळी कुटुंबीयांनी रिचर्डला केलेली मदत ते लोक विसरून गेले होते, मात्र रिचर्ड विसरला नव्हता. आपल्या मायदेशी परत गेल्यांनतर रिचर्ड राजकारणात उतरला. न्यारीबरी चाचे मतदारसंघातून तो खासदार बनला. त्यासोबतच केनियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालय समितीचे उपाध्यक्ष पदावरही त्याची नेमणूक झाली. काही दिवसांपुर्वी रिचर्ड आपल्या पत्नी मिशेल यांच्यासोबत भारतात आले होते. तीस वर्षांपूर्वीच्या मदतीची जाण ठेवून रिचर्ड त्या मदतीची परतफेड करण्यासाठी ते औरंगाबादला आले होते.

…आणि तो भावनिक क्षण

औरंगाबादमध्ये येताच रिचर्ड यांनी गवळीचे घर शोधले आणि घराचा दरवाजा खटखटावला. गवळींनी दार उघडताच त्यांना दारात एक विदेशी व्यक्ती दिसली. गवळींना काही समजायच्या आतच रिचर्ड यांनी आपली ओळख करून दिली. आपण ३० वर्षांपूर्वी तुमच्याकडून घेतलेले उसने पैसे परत करण्यासाठी आलो आहे, हे ऐकताच काशिनाथ गवळी भावुक झाले.

त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. काशिनाथ गवळींनी रिचर्ड यांना आपल्या घरी जेवायला घातले. रिचर्ड यांनी औरंगाबाद सोडताना गवळींना केनियाला येण्याचे निमंत्रण दिले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *