यापूर्वीही दोन दिवसाचा झाला होता भारताचा वर्ल्डकपमधील एक सामना, वाचा कोण जिंकले होते?

वर्ल्डकप २०१९ चा थरार अंतिम टप्प्यात आला असून सध्या सेमीफायनलच्या मॅच सुरु आहेत. या वर्ल्डकपमध्ये पावसाने चांगलाच व्यत्यय आणला आहे. सेमीफायनलमध्ये देखील पावसाने व्यत्यय आणला असून कालचा खेळ रद्द करण्यात आला आणि सामना राखीव दिवशी म्हणजे आज खेळवण्यात येणार आहे.

मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सेमीफायनलच्या या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजाना धावा काढणे कठीण गेले. न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलरच्या अर्धशतकाच्या बळावर ४६.१ ओव्हरमध्ये ५ बाद २११ धावा केल्या आहेत.

आज सामना काल जिथून खेळ थांबवण्यात आला तिथून पुढे खेळला जाणार आहे. भारताला पूर्ण ५० ओव्हर खेळायला मिळतील. आज पावसाची शक्यता कमी असल्याने पूर्ण सामना होण्याची शक्यता आहे. पावसामुळे हा एकदिवशीय सामना दोन दिवशीय झाला आहे. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली असून आता भारतीय फलंदाजांनी विजयी पताका फडकवून फायनलमध्ये प्रवेश करण्याचे आव्हान आहे.

यापूर्वीही दोन दिवसाचा झाला होता भारताचा वर्ल्डकपमधील सामना-

पावसामुळे एक दिवसाचा खेळ रद्द होऊन उरलेला सामना दुसऱ्या दिवशी होणे हे भारतासाठी काही नवीन नाहीये. भारताचा अशाचप्रकारे एक सामना यापूर्वीही झाला होता. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये अशाचप्रकारे भारताचा सामना राखीव दिवशी झाला होता.

भारत आणि इंग्लंडदरम्यान हा सामना झाला होता. बर्मिंगहॅमच्या एडबॅस्टन मैदानावर खेळवण्यात आला होता. हा सामना २९ मे रोजी सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी संपला. या सामन्यात भारतीय संघाने ६३ धावांनी विजय मिळवला होता.

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती. भारताने या सामन्यात २३२ धावा केल्या होत्या. भारताकडून राहुल द्रविडने ५३ आणि सौरव गांगुलीने ४० धावा केल्या होत्या. इंग्लंडचा २० ओव्हरच्या फलंदाजीनंतर पाऊस आला आणि सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्यात आला होता. या सामन्यात राखीव दिवशी इंग्लंडचा संघ १६९ धावांवर सर्वबाद झाला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *