असे झाल्यास सेमी फायनल न खेळता भारत पोहचणार फायनलमध्ये!

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC Cricket World Cup मध्ये लवकरच सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. सेमीफायनलचा पहिला सामना ९ जुलै रोजी भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड असल्याचं मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वर्ल्ड कपमधील साखळी सामन्यांत भारताने दमदार कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर भारतीय संघानं गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने दुसरे इंग्लंडने तिसरे आणि न्यूझीलंडने चौथे स्थान मिळवले. अव्वल स्थानी असल्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध रंगणार आहे.

यंदाच्या विश्वचषकात पावसाचा मोठा अडथळा बघायला मिळाला. पावसामुळे आतापर्यंत सर्वाधिक सामने यावेळी रद्द झाले. पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यांचा फटका श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात बसला. एकप्रकारे त्यांचे सेमीफायनलचे तिकीट पावसामुळे हुकल्याचे दिसते. सेमीफायनलच्या सामन्यांवर देखील आता पावसाचे सावट असणार आहे.

९ जुलै रोजी होणाऱ्या भारत न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास ICC कडून सेमीफायनलच्या मुकाबल्यासाठी आणखी एका अतिरिक्त दिवसाची तरतूद करण्यात आली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा ९ जुलैचा सामना रद्द झाल्यास हा सामना १० जुलैला खेळवण्यात येणार आहे. पण इंग्लंडमधील हवामानाच्या अंदाजानुसार या दोन्ही दिवशी ज्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार तिथं ढगाळ वातावरण राहणार असून सामन्यावर पावसाचं सावट आहे.

दोन्ही दिवशी सामना रद्द झाल्यास काय होईल?

सेमीफायनलचा सामना रद्दच झाला तर यामध्ये भारताला लॉटरी लागणार आहे. गुणतालिकेत भारताचे १५ गुण आहेत तर न्यूझीलंडचे ११ गुण आहेत. सामना रद्द झाल्यास जास्त गुण असणाऱ्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाला तर भारताला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

भारतीय संघ सामना झाला तरी न्यूझीलंडला पराजित करून फायनलमध्ये प्रवेश करेल असेच दिसते. भारताचा या विश्वचषकातील खेळ बघता या विश्वचषकाचे प्रमुख दावेदार भारतालाच मानले जात आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *