कधीकाळी रेल्वे स्टेशनवर काम करणारा धोनी भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन असाच नाही बनला!

आज महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस ! माही ३८ वर्षांचा झाला ! क्रिकेट समीक्षकांच्या भाषेत संघातील अनुभवी खेळाडू, चाहत्यांच्या भाषेत दिग्गज आणि ट्रोलर्सच्या भाषेत म्हातारा वगैरे !

तसं बघायला गेलं तर कुठल्याही क्रिकेट खेळाडूने निवृत्ती घ्यायच्या वयात धोनी आला आहे. आपण बघितलेल्या खेळाडूंपैकी तेंडुलकर ४०, द्रविड ३९, युवराज ३८, कुंबळे ३८, लक्ष्मण ३८, गांगुली ३५, सेहवाग ३५ आणि हरभजन ३५ व्या वयापर्यंत क्रिकेट खेळून निवृत्त झाले आहेत. यातल्या प्रत्येकाने भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सर्वांच्या लक्षात आहेत. आज धोनी वयाच्या अशाच टप्प्यावर आहे. वाढदिवस तर दरवर्षीच येईल, पण एक चाहता म्हणुन धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या बद्दलच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळत असेल तर ती का दवडावी ?

कधीकाळी खरगपूर रेल्वे स्टेशनवर काम करणारा धोनी, त्याच्या क्रिकेट कौशल्याच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार झाला. देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी त्याच्या नेतृत्वाखालील संघाने करुन दाखवली. रांची सारख्या छोट्या शहरातून आलेल्या धोनीचा “तिकीट कलेक्टर ते ट्रॉफी कलेक्टर” हा प्रवास संघर्षाचा आहे.

२००६ च्या हच कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्यासमोरच पाकिस्तानच्या बॉलर्सला फोडून काढत त्यांच्या हातातला विजय खेचून भारताकडे आणणारा एमएस धोनी आपण बघितला आहे. त्यांनतर परवेझ मुशर्रफांनी “हा धोनी तुम्हाला कुठं मिळाला?” असा प्रश्न सौरव गांगुलीला विचारला होता. तेव्हा दादाने उत्तर दिले होते, “धोनी तो वाघा बॉर्डर के पास घूम रहे थे और हमने उन्हें अंदर खींच लिया था !” दादाने धोनीत भारताचे भविष्य शोधले होते.

मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे ते धोनीकडे बघितल्यानंतर समजते. २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकप, २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही प्रकाराच्या आयसीसी स्पर्धा भारताला जिंकुन देणारा सर्वात यशस्वी कॅप्टन ! सर्वाधिक स्टम्पिंग करणारा विकेटकीपर ! सहाव्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन ! सर्वोत्कृष्ट मॅच फिनिशर !

क्रिकेटच्या इतिहासात ४२ सामन्यांच्या कमी कालावधीत पहिल्यांदा २००६ मध्ये आणि त्यानंतर २००९ मध्ये आयसीसी रँकिंगमध्ये पहिले स्थान पटकवणारा बॅट्समन ! २००८ आणि २००९ मधील भारताचा पहिला ICC प्लेयर ऑफ द इयर ! १२ टेस्ट सिरीज, २४ वनडे सिरीज आणि १० टी-२० सिरीज जिंकून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताला जगात पहिल्या क्रमांकावर नेणारा कर्णधार ! २००७ मध्ये खेलरत्न, २००९ मध्ये पद्मश्री आणि २०१८ मध्ये पद्मभूषण प्राप्त खेळाडू ! कपिल देव नंतर २०१२ मध्ये लेफ्टनंट कर्नल मानद पदवी प्राप्त झालेला एकमेव भारतीय क्रिकेटर ! कुठल्याही संघाचा सर्वाधिक ३३१ सामने कॅप्टन राहिलेला खेळाडू !

एवढी यशाची शिखरे चढलेल्या माणसाला आयुष्यात अजुन काय लागतं ? पण आपल्या एक चांगला क्रिकेटर म्हणुन ओळ्खण्यापेक्षा एक चांगला माणूस म्हणून ओळखले जावे ही त्याची अपेक्षाच त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही सांगुन जाते.

२००४-०५ च्या दरम्यान भारतीय संघात निवड झाल्यानंतर धोनीच्या गर्लफ्रेंडचा अपघातात झालेला मृत्यु ही त्याच्या आयुष्यातील सर्वात भावुक घटना होती. परंतु या धक्क्यातून स्वतःला सावरत असतानाच त्याने संघालाही सावरण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. कालांतराने त्याच्या आयुष्यात आलेल्या साक्षी रावतमुळे धोनी वैयक्तिक आयुष्यात सावरला आणि दोघांचे नाते बातम्यांमधील चर्चेचा विषय बनण्याआधीच त्यांनी २०१० मध्ये विवाह केला.

२००४ मध्ये गांगुलीने महेंद्रसिंग धोनीमध्ये जो विश्वास दाखवला होता तो त्याने खरा करुन दाखवला. १५ वर्ष भारतीय संघाचा यशस्वी विकेटकीपर म्हणुन तो खेळला. धोनीला क्रिकेट खेळात असणारी जाण, त्याची गुणवत्ता आणि कामगिरी यांच्या जोरावर संघाचे नेतृत्व त्याच्याकडे आले. निवड समितीने आपल्यावर दाखवलेला विश्वासही त्याने खरा करुन दाखवला. जुन्या नव्या खेळाडूंना घेऊन पुन्हा संघ बांधला. कधी संघ पराभुत झाला तर स्वतः पराभवाची जबाबदारी घेऊन मिडीयाला उत्तरे दिली. संघाचा विजय झाल्यानंतर सेलिब्रेशनमध्ये सर्वात मागे थांबला. ९ वर्ष त्याने भारताचा कर्णधार म्हणुन धुरा वाहिली. भारतीय संघाला त्याने एका वेगळ्या उंचीवर नेले.

संघात विराट कोहलीसारखा परिपक्व खेळाडू तयार झाल्याचे पाहून योग्य वेळी त्याने कर्णधारपदाची जबाबदारी कोहलीच्या खांद्यावर दिली. हीच तर एखाद्या चांगल्या कर्णधाराची खासियत असते. धोनी आज संघात एखाद्या मार्गदर्शकाप्रमाणेही भूमिका पार पाडत आहे. आपल्या सोबतच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. युवा बॉलर्सला वेळोवेळी बॉलिंगच्या टिप्स देत आहे. धोनीसारखा अनुभवी खेळाडू स्टंपच्या मागे असल्यानेच कॅप्टन विराट कोहली सीमारेषेवर जाऊन क्षेत्ररक्षण करू शकतोय. धोनी DRS सिस्टमवर सगळ्या संघाला विश्वास आहे.

धोनीबद्दल आज जगातील सर्वच यशस्वी क्रिकेट खेळाडू कौतुकाचे शब्द वापरतात. सुनिल गावसकर सारखा खेळाडू जर “जीवनाचा अंतिम श्वास घेताना मला धोनीचा फायनलमधील तो मॅच विनिंग सिक्सर बघायला आवडेल” या शब्दात त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करत असेल तर मग यातच सर्व आले ! तेंडुलकर सारखा क्रिकेटचा देवसुद्धा “मी ज्यांच्या नेतृत्वाखाली खेळलो त्यातला धोनी हा सर्वोत्कृष्ट कॅप्टन आहे” या शब्दात त्याचा गौरव करतो. आज ना उद्या धोनी निवृत्त होणारच आहे. जाताना आपल्यानंतर कोण या प्रश्नाचे उत्तरही तो संघाला देऊन जाईल.

मात्र २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये धोनीचे वय झाले, धोनी म्हातारा झाला, धोनी बॉल खातो असे म्हणत त्याला ट्रोल केले जात आहे. आतापर्यंतच्या सामन्यात खेळलेल्या २३९ बॉलमध्ये ९३ च्या स्ट्राईक रेटने २२३ धावा अशी त्याची कामगिरी आहे. आज जे धोनीला ट्रोल करत आहेत, ते कधीकाळी धोनीच्या कामगिरीने आनंद साजरा करत होते. वाढत्या वयानुसार धोनीच्या कामगिरीत घसरण होत असताना त्याच्यावर टीका अपेक्षितच आहे. पण त्याला द्वेषाची झालर नसावी. कारण धोनी सारख्या खेळाडूला कितीही द्वेषाने ट्रोल केले, तरी भविष्यात हे ट्रोलर्स किंवा त्यांच्या ट्रोल्सचे रेकॉर्ड कोण लक्षात ठेवणार नाही. लोक लक्षात ठेवतील ते फक्त भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, विकेटकीपर, फिनिशर, कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी !

सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज खेळाडूला २०११ मध्ये वर्ल्ड कप हातात घेऊनच अलविदा करण्याची कामगिरी धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केली होती. त्याचीच पुनरावृत्ती धोनीच्या निमित्ताने झाली तर यासारखी आनंदाची गोष्ट नाही.

माही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
-अनिल माने
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *