क्रिकेटविश्वात भारताचाच दबदबा! जागतिक क्रमवारी बघून तुम्हीहि म्हणाल शाब्बास रे पठ्ठ्यांनो..

टीम इंडियानं मॅन्चेस्टरमध्ये वेस्ट इंडिजचा १२५ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं आहे. या सामन्यात टीम इंडियानं विंडीजला विजयासाठी २६९ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ १४३ धावात आटोपला.

तत्पूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताला रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का लवकर बसला. त्यानंतर केएल राहूल आणि विराट कोहलीने भागीदारी करत भारताला मजबूत धावसंख्येकडे वाटचाल करून दिली. पण त्यानंतर राहुल ४८ धावा करून बाद झाला आणि भारतीय संघ अडचणीत सापडला.

केदार जाधव आणि विजय शंकर अपयशी ठरले आणि भारताची अवस्था बिकट झाली. कोहली ७२ धावा करून बाद झाल्यानंतर भारताची अवस्था ५ बाद १८० झाली होती. त्यानंतर धोनी आणि पंड्याने सुरुवातीला सावरत नंतर फटकेबाजी करत भारताला २६८ धावांपर्यंत मजल मारून दिली. पंड्याने आक्रमक ४६ धावांची खेळी केली तर धोनीने शेवटच्या षटकात फटकेबाजी करत ५६ धावांची नाबाद खेळी केली.

भारतीय गोलंदाजांपुढे वेस्ट इंडिजचे फलंदाज निष्प्रभ ठरले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन विकेट्स घेत मोलाचे योगदान दिले.

क्रिकेट विश्वावर भारताचाच दबदबा-

या विजयासह विराट कोहलीच्या टीम इंडियानं इंग्लंडला मागे टाकून वन डे सामन्यांच्या आयसीसी क्रमवारीत नंबर वनवर झेप घेतली आहे. ताज्या क्रमवारीत टीम इंडियानं १२३ रेटिंग गुणांसह आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी, इंग्लंड १२२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर तर न्यूझीलंड ११४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

याशिवाय भारतीय संघ कसोटीमध्ये देखील ११३ गुणांसह अव्वल स्थानी आहे. कसोटीत न्यूझीलंड १११ गुणांसह दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका १०८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

वनडेमध्ये फलंदाजीत विराट कोहली अव्वल स्थानी आणि रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. तसेच वनडेमध्ये गोलंदाजीत भारताचाच जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी आहे. याशिवाय कसोटीमध्ये देखील फलंदाजीत विराट कोहली अव्वल स्थानी असून चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानी आहे.

विश्वक्रिकेटमध्ये फक्त पुरुषांचाच नाही तर महिलांचा देखील दबदबा आहे. महिलांच्या वनडे क्रमवारीत फलंदाजीत स्मृती मनधना अव्वल स्थानी तर गोलंदाजीत झुलन गोस्वामी अव्वल स्थानी आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *