बाळासाहेब थोरात : जोर्वे गावातला साधा कार्यकर्ता ते विधानसभेतील काँग्रेसचा विधिमंडळ नेता

महाराष्ट्राचे माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेते पदी निवड झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा नगर जिल्ह्याला विधानसभेत विरोधी पक्षाचे विधिमंडळ नेतेपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. या निवडीमुळे नगर जिल्ह्यात आणि विशेषतः संगमनेर तालुक्यात या निर्णयाचे स्वागत होत आहे. संगमनेर तालुक्यातील जोर्वेसारख्या गावातील काँग्रेसचा साधा कार्यकर्ता ते पक्षाचा विधिमंडळ नेता हा बाळासाहेब थोरातांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे.

हा १९८५ चा काळ होता. प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणाच्या पाण्याचा प्रश्न पेटला होता. या पाण्यावर संगमनेर आणि अकोल्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचे सांगत पूर्व भागातील राजकीय नेत्यांनी हरकत घेतली होती. हा पाणीप्रश्न केंद्रस्थानी ठेवून बाळासाहेब थोरातांनी निवडणूक लढवली आणि अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. १९८९ मध्ये प्रवरेच्या पाण्याच्या फेरवाटपाचा आग्रह धरत त्यांनी लोकचळवळ उभी केली आणि अखेरीस संघर्ष करून भंडारदरा धरणातील ३०% पाणी संगमनेर आणि अकोले तालुक्याला मिळवून दिले. इथून त्यांची राजकीय कारकीर्द बहरली.

बाळासाहेब थोरातांनी १९८५ पासून सलग ७ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले. आघाडी सरकारच्या काळात पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री, कॅबिनेटमध्ये कृषिमंत्री आणि महसुलमंत्री म्हणून काम केले. त्याबरोबरच महाराष्ट्र्र विडी कामगार वेतन समिती अध्यक्ष, संगमनेर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष, संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष अशी पदे त्यांनी सांभाळली.

याशिवाय नॅशनल हेवी इंजिनीअरिंग सहकारी संस्थेचे डायरेक्टर, आलं इंडिया डिस्टिलरी असोसिएशनचे डायरेक्टर म्हणूनही काम पाहिले. महाराष्ट्र्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस म्हणून त्यांना पक्षाचे काम करता आले. लातुर, उस्मानाबाद, नागपुर आणि औरंगाबादचे पालकमंत्रीपद त्यांनी भूषवले.

संगमनेर तालुक्यात अमृतवाहिनी सहकारी दूध संस्था, शासकीय दुग्धशाला, संगमनेर तालुका सहकारी सूतगिरणी, डेन्टल कॉलेज या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील लोकांचा आर्थिक आणि शैक्षणिक स्तर उंचावण्याचे काम केले.

बाळासाहेब थोरात हे एक अत्यंत संयमी, अभ्यासू, चारित्र्यवान आणि कार्यक्षम राजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांपासून तिथल्या प्रश्नाची इत्यंभूत माहिती त्यांना आहे. एवढेच नाही दिल्लीतही राहुल गांधींजवळ त्यांचे चांगलेच वजन आहे. त्यामुळेच गुजरात निवडणुकांवेळी सदस्य निवडीच्या अध्यक्षपदावर त्यांना काम करता आले. तसेच हिमाचल प्रदेशमध्येही विधानसभा निवडणुकांवेळी निरीक्षक म्हणून बाळासाहेबांनी काम केले.

असा हा साधा कार्यकर्ता ते महाराष्ट्र विधानसभा काँग्रेस विधिमंडळ नेते हा बाळासाहेब थोरातांचा प्रवास थक्क करणारा आहे. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *