दहावी पास झालेल्या पुतण्यास काकांचे हृदयस्पर्शी पत्र!

मागच्याच आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल लागला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळाले असेल तर काहींना अपयश देखील मिळाले असेल. निकाल लागल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. पण जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरी या गावात मात्र या निकालानंतर दुःखाचे वातावरण होते.

या गावातील वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चांदई येथील प्रकाश वाघमारे यांचा मुलगा आकाशने दहावीची परीक्षा दिली होती. घरची परिस्थिती हलाखीची होती. आकाशला प्रेमाने अब्दुल म्हंटले जायचे. कारण त्याचा जन्म डॉ एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती होते तेव्हा झालेला. म्हणून आईने प्रेमाने अब्दुल नाव ठेवलेले.

आकाशचे काका कैलाश वाघमारे हे अभिनेते असून त्यांनी आजपर्यंत अनेक मोठ्या मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलं नाव कमावलं आहे. आकाश त्याचे काका कैलाश यांना त्याला काही करून मुंबईला ऍडमिशन घ्यायचं म्हणून बोलायचा. पण आकाशने १३ मे ला दहावीचा निकाल लागायच्या आधीच जगाचा निरोप घेतला.

आकाश त्यांच्या घरच्या शेतात शेततळ्यात बुडणाऱ्या मुलांना वाचवायला गेला आणि परत आलाच नाही. आकाशला दहावीत ६४ टक्के मार्क मिळाले आहेत. पण त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आकाशच्या निकालानंतर त्याचे काका कैलाश वाघमारे यांनी एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले आहे-

“आज आमच्या “अब्दुल” ला दहावीत 64% मार्क मिळालेत! अभिनंदन डीयर!

अब्दुल कलाम राष्ट्रपती होते तेंव्हा याचा जन्म झाला. म्हणून माय ने याचे नाव अब्दुल ठेवले. याला मुंबईत शिकायला यायचय! म्हणूण बाकीच्या मुलांसारख्याच कच्चून कॉप्या केल्या होत्या या बहादराने. तथाकथीत अभ्यासात तर हुशारच पण कमालीचं व्यवहारज्ञान. खुऊप बोलका! प्रश्नांचे भडिमार करणारा! आजोबाची घरीच शेवींग करणारा! घरच्यांपासुन दोस्तांलोक सगळ्यांनाच कमालीचा जीव लावणारा! येक्दम स्टायलीश बॉय!
चुटूक मुटूक प्रश्नांचा जातिवंत इलाज! तो असतांना कुणाला काही होऊदेने हे त्याच्या स्वभावातच नाही.

मागच्याच महिन्यात 13 मे ला घरच्याच शेततळयात पोहताना बुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेला आणि परतच नाही आला…….
अब्दुल माय डीयर! “काही करुन मुंबईत एडमिशन घेऊन द्या काका”असं म्हणाला होतस न? तू पास झाल्याचं मला तुझ्याच तोंडून ऐकायचय! मी मुंबईच्या कॉलेज बाहेर तुझ्या फोन ची वाट बघतोय!
तुझाच काका….”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *