आजच्या सामन्यात विराट कोहली तोडू शकतो सचिन तेंडुलकरचा हा मोठा विक्रम..

भारताने २०१९ च्या विश्वचषकातील पहिले दोन सामने जिंकून दणक्यात सुरुवात केली आहे. इंग्लंडमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत पावसाने मोठी बाधा आणली आहे. पावसामुळे आतापर्यंत ३ सामने रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. भारताचा विश्वचषकातील तिसरा सामना आज होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणाऱ्या या लढतीवर पावसाचे सावट आहे. जर हा सामना झालाच, तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही कोणता ना कोणता तरी विक्रम मोडणारी ठरते, त्यात त्याच्या विक्रमाची तुलना तेंडुलकरशी केली जाते. त्यामुळे किवींविरुद्ध ५७ धावा केल्यास कोहली तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे.

या स्पर्धेत सुरुवातीच्या दोन सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. सर्वच फलंदाजांनी आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. मागच्या सामन्यात शिखर धवनने शतक ठोकले तर विराट कोहलीने देखील ८२ धावांची दमदार खेळी खेळली होती. या सामन्याला शिखर धवन दुखापतीमुळे मुकणार आहे.

या सामन्यात विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. विराटला आपल्या ११००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यासाठी ५७ धावांची गरज आहे. कोहलीने २२१ डावांत १०९४३ धावा केल्या आहेत. वनडेमध्ये सर्वात जलद ११००० धावा करण्याचा विक्रम तो आज आपल्या नावावर करू शकतो. यापूर्वी सर्वात जलद १०००० धावा करण्याच्या विश्वविक्रम देखील कोहलीच्या नावावर आहे.

विशेष म्हणजे आज विराट कोहलीने ११००० धावा पूर्ण केल्यास तो ११ वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा पहिलाच फलंदाज ठरेल. तसेच वन डे क्रिकेटमध्ये ११००० धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.

याशिवाय कोहलीला न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतक करणाऱ्या वीरेंद्र सेहवाग व रिकी पाँटिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचीही संधी आहे. शिवाय न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत दुसऱ्या स्थानी झेप घेण्याचा विक्रमही त्याला खुणावत आहे. सेहवागनं किवींविरुद्ध २३ डावांत ११५७ धावा केल्या आहेत, तर तेंडुलकरच्या नावावर १७५० धावा आहेत. कोहलीनं १९ डावांत ११५४ धावा केल्या आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *