हे राज्य बनलं पाच-पाच उपमुख्यमंत्री असणारं भारतातील पहिलं राज्य!

२००९ मध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. वाई.एस. राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा वाई. एस. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशमध्ये आपला राजकीय प्रवेश सुरु केला. वडिलांच्या निधनानंतर त्यांना मुख्यमंत्री पद न दिल्याने त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून आपला वेगळा पक्ष स्थापन केला.

त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी अनेक संकटांचा सामना केला पण ते लढत राहिले आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवत आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवला. तब्बल दहा वर्षाच्या संघर्षानंतर जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्त्वाखालील तेलगू देसम पक्षाचा सुपडासाफ केला. वायएसआर काँग्रेसने १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या. तर त्यांच्या पक्षाने लोकसभेच्या २५ पैकी २२ जागा मिळवल्या. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अनेक धडाकेबाज निर्णयाची मालिकाच सुरु केली आहे.

नुकतेच आशा वर्कर्सना केलेल्या तिप्पट पगारवाढीची देशभरात चर्चा झाली. त्यानंतर आज जगनमोहन रेड्डी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाच उपमुख्यमंत्री अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील असणार आहेत. जगमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधीमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली.

देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्यात पाच उपमुख्यमंत्री असणार आहेत. याआधी चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळात दोन उपमुख्यमंत्री होते. यामधील एक मागासवर्गीय जाती आणि दुसरे कापू समाजातील होते. शनिवारी २५ जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती जगमोहन रेड्डी यांनी दिली आहे.

अडीच वर्षांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांचं बारीक लक्ष देखील आपल्यावर असल्याने कारभार व्यवस्थित चालावा आणि प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचावा म्हणून हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आपल्या आणि आधीच्या सरकारमध्ये काय फरक आहे हे लोकांना दाखवून देणं गरजेचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *