महाराष्ट्राची लालपरी ७१ वर्षांची झाली, हे होते पहिले कंडक्टर..

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणाशी जोडणारी महाराष्ट्राची लालपरी म्हणजेच एसटी ७१ वर्षांची झाली आहे. १ जुन १९४८ रोजी महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाने आपली बससेवा सुरु केली होती. कोट्यवधी नागरिकांची लोकवाहिनी म्हणून लालपरीला ओळखले जाते. लालपरी, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही असा तिचा काळानुसार प्रवास सुरु आहे. राज्याच्या ९०% भागात “प्रवाशांच्या सेवेसाठी” हे ब्रीद घेऊन धावणाऱ्या एसटीच्या इतिहासातील आठवणींना उजाळा देण्याचा छोटासा प्रयत्न…

अशी सुरु झाली बस सेवा

ब्रिटिश भारतातुन निघून गेल्यानंतर मुंबई प्रांत सरकारने १९४८ मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (BSRTC) या नावाने सरकारी प्रवासी वाहतूक कंपनी स्थापन केली. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे सर्वाधिकार या कंपनीकडे होते. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापन झाले. गाव तिथे एसटी, रस्ता तिथे एसटी हे ब्रीदवाक्य घेऊन एसटीचा प्रवास सुरू झाला.

कशी होती पहिली बस ?

आपण आज पाहतो त्यापेक्षा पहिली बस कितीतरी वेगळी होती. पहिल्या बसची संपूर्ण बॉडी लाकडाची बनविण्यात आली होती. तिचे वरचे छत कापडाचे होते. त्या एसटीची आसन क्षमता ३० होती. १ जुन १९४८ रोजी सकाळी ८ वाजता ही बस अहमदनगर वरुन पुण्याला निघाली. त्यावेळी अहमदनगर ते पुणे प्रवासासाठी केवळ अडीच रूपये तिकीट आकारण्यात आले होते. बघितला तर दीडशे किलोमीटरच्या जवळपास प्रवास होता, पण प्रवाशांना बसचा पहिला प्रवास करताना धकधक होती. अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या भीतीने माळीवाडा वेस ते शिवाजीनगर (पुणे) प्रवासाला पोलीस संरक्षण होते.

पहिल्या बसची गावागावात झाली पुजा

सरकारी एसटी बस म्हणजे त्यावेळी लोकांसाठी खूप अप्रूप होते. अहमदनगर वरुन पुण्याला निघालेल्या बसला वाटेत सुपा, शिरुर, लोणिकंद सारखी गावे लागली. आपल्या गावामधून एसटी जाणार म्हणून लोक गर्दी करत होते. एसटीत बसण्यास सर्वजण उत्सुक होते, मात्र ३० लोकांचीच आसन क्षमता असल्याने सर्वांना ते शक्य झाले नाही. मात्र एसटी आपल्या गावात येताच लोक तिचे जल्लोषात स्वागत करीत होते. गावातील सुवासिनी आरतीचे ताट हातात घेऊन बसला ओवाळत होत्या.

कोण होते बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर ?

किसन राऊत हे पहिल्या एसटी बसचे ड्रायव्हर तर लक्ष्मण केवटे हे तिचे कंडक्टर होते. विशेषतः दोघेजणही अहमदनगरचेच होते. त्यावेळी महामंडळाची स्थापना झालेली नव्हती. लक्ष्मण केवटे यांना पहिल्या बसचे कंडक्टर म्हणून ८० रुपये पगार मिळायचा, तर महामंडळाची स्थापना झाल्यानंतर त्यांना १५० रुपये पगार झाला. १ जून २०१९ रोजी मुंबईत त्यांचा सन्मान करण्यात आला

आपल्याला हि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *