एका चेंडूत २८६ धावा, क्रिकेटच्या इतिहासातील अपरिचित किस्सा !

क्रिकेटच्या विश्वातील एक चित्र आणि त्याच्यासोबत चिकटलेली एक मनोरंजक गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहित नाही. ती गोष्ट म्हणजे एका सामन्यात १ चेंडूत २८६ धावा बनवल्याची आहे. पण कशा ? क्रिकेटमध्ये असा काही नियम नाही की एका चेंडूत २८६ धावांचा शॉट मारला जाईल. पण असाही काही नियम नाही की बॅट्समनला एक शॉट मारल्यावर धावून अमुक इतक्याच धावा काढता येतील. चला तर मग या फोटोमागचा किस्सा जाणून घेऊया…

काय आहे हा किस्सा ?

गोष्ट अशी आहे की १५ जानेवारी १८९४ रोजी व्हिक्टोरिया आणि ऑस्ट्रेलियाच्या स्क्रॅच ११ या दोन संघांमध्ये बॉनबरी मैदानावर एक क्रिकेट सामना खेळवण्यात आला. मॅचच्या पहिल्या चेंडुवरच बॅट्समनने जोरदार शॉट मारला. बॅट्समनने मारलेला चेंडू मैदानातच असणाऱ्या एका निलगिरीच्या उंच झाडावर जाऊन अडकला. इकडे क्रीजवर दोन्ही बॅट्समन न थांबता धावत राहिले.

जोपर्यंत चेंडू झाडावरून खाली उतरवला जातोय तोपर्यंत दोन्ही बॅट्समननी २८६ धावा काढल्या होत्या. यादरम्यान बॅट्समननी क्रीजमध्ये जवळपास ६ किलोमीटरचे अंतर धावले होते.

फिल्डिंग टीमची बॉल काढण्यासाठी धडपड

निलगिरीचे झाड मैदानाच्या मध्येच होते. त्यावर चेंडू अडकल्याने फिल्डिंग टीमने एकामागोमाग एक धावा काढणाऱ्या बॅट्समनला रोखण्यासाठी अंपायरला चेंडू हरवला म्हणून घोषित करण्याची विनंती केली. मात्र झाडावर अडकलेला चेंडू स्पष्ट दिसत असल्याने त्याला हरवला म्हणून घोषित करता येणार नाही, असे सांगून अंपायरने फिल्डिंग टीमची विनंती धुडकावून लावली. त्यानंतर फिल्डिंग टीमने कुणालातरी कुऱ्हाड आणण्यासाठी पाठवले, मात्र त्यालाही कुऱ्हाड मिळाली नाही असे सांगण्यात येते.

चेंडू काढण्यासाठी रायफलचा वापर

इकडे झाडावर चेंडू अडकला आहे आणि तिकडे बॅट्समन धावा काढत आहेत, यामुले चिंतीत असणाऱ्या फिल्डिंग टीमने शेवटी कुणाच्यातरी घरून रायफल मागवली आणि नेम धरून चेंडू झाडावरून खाली पाडला. चेंडू खाली पाडतेवेळी फिल्डींग करणारे इतके हताश झाले होते की, त्यांच्यापैकी कुणीही चेंडू कॅच करण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू जर कॅच केला असता तर बॅट्समनने धावलेल्या सगळ्या धावा शून्य झाल्या असत्या. बॉल खाली आल्यावर बॅटिंग टीमने एका चेंडूत २८६ धावा काढून आपला डाव घोषित केला. हा एक रेकॉर्डच आहे.

हा किस्सा कुठून समोर आला ?

क्रिकेटबद्दल माहिती देणाऱ्या विश्वसनीय अशा ESPNcricinfo वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका ब्लॉगमध्ये केईकेत लेखक मायकल जोन्स यांनी सांगितले आहे की, या बातमीचा एकमात्र संदर्भ इंग्रजी वर्तमानपत्र Pall Mall Gazette असल्याचे मानले जाते. त्याच वर्तमानपत्राच्या खेळविषयक पानावर याची बातमी छापण्यात आली होती. त्यानंतर ती बातमी इंग्लंड, ऑस्ट्रेलियासहित अमेरिकेतील वर्तमानपत्रातही छापण्यात आली होती.

कॅमेरात हे रेकॉर्ड कैद होऊ शकले नाही. एका चेंडूवर सर्वाधिक धावा घेण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या गॅरी चॅपमनच्या नावावर नोंद असून त्याने एका क्लब मॅचमध्ये एका चेंडूवर १७ रन काढल्या होत्या. याची नॉन्ग गिनीज बुकात आहे. (पान २४७, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड १९९२)

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *