१ जूनला इतक्या लोकांचे वाढदिवस का असतात ?

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. यादिवशी सर्व परिचित आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपले कौतुक करतात. सर्वांचे आपल्यावरील प्रेम वाढदिवसाच्या या दिवशी व्यक्त केले जाते. पण आपल्याकडे १ जून हा असा दिवस आहे की, बहुतांश लोकांचा यादिवशी वाढदिवस असतो. नेमक्या कोणाकोणाला शुभेच्छा द्याव्यात हा प्रश्न पडतो. फेसबुकवरच्या नेटिझन्सने तर हा दिवस राष्ट्रीय वाढदिवस दिन म्हणूनच त्याचे वर्णन
केले आहे.काय कारण असेल बरं ?

जन्मतारखेची नव्हती ठेवली जात नोंद !

पूर्वीच्या काळात शाळा नव्हत्या किंवा कमी प्रमाणात होत्या. तसेच बाळंतपणे दवाखान्याऐवजी घरीच होत असल्याने मुलाबाळांच्या जन्माची तारीख, वेळ, दिवस अशी नोंद ठेवण्याइतकी जागरूकता तेव्हाच्या काळात नसायची.

आपल्या बाळाचा जन्म कोणत्या दिवशी झाला हे सणांवरून किंवा नैसर्गिक घटनांवरून लक्षात ठेवले जायचे. एखाद्यावर्षी दुष्काळ पडला किंवा मोठा पाऊस झाला त्यावर्षीच्या सणांच्या मागेपुढे जन्म झाला एवढीच मुलांच्या जन्माची नोंद असायची. कित्येकदा आईवडिलांच्या तेवढेही लक्षात नसायचे.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेली जन्मतारीख १ जून

पूर्वीच्या काळात शाळा १ जूनला सुरु व्हायच्या. त्यावेळी एखाद्या मुलाला शाळेत घालायची वेळ आलीच तर शाळेचे मुख्याध्यापक मुलांच्या आईवडिलांना किंवा पालकांना जन्मतारीख विचारायचे. ज्या मुलांच्या जन्मतारखेविषयी काहीच नोंद नसायची अशा विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सरसकट १ जून ही जन्मतारीख द्यायचे आणि शाळेत त्यांचा प्रवेश करून घ्यायचे.

ज्यांची शाळेत जन्मतारीख नोंद केली आहे अशा लोकांना नोकरी किंवा पुढच्या शिक्षणासाठी अडचणी येत नसायच्या. त्यामुळे १ जून यादिवशी अनेकांचे वाढदिवस येतात.

१ जूनला वाढदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास कामगार नेते डॉ.बाबा आढाव, ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे, रंगनाथ पठारे, लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे, गो.नि.दांडेकर, हरी नरके, राजू शेट्टी, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, इत्यादी लोकांसोबत आपल्या गावातही अनेकांचे वाढदिवस १ जूनला असतात. सर्वसाधारणपणे १९७० पर्यंतच्या काळात अशा जन्मतारखेची नोंद जास्त प्रमाणात झाली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *