भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनलेल्या निर्मला सीतारमण कोण आहेत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा नुकताच शपथविधी पार पडला. यानंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटपही जाहीर करण्यात आले. यामध्ये माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचीमहत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर देशातील संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्या देशातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनल्या आहेत.

खासरेवर जाणून घेऊया निर्मला सीतारमण यांच्याविषयी थोडक्यात माहिती..

कोण आहेत निर्मला सीतारमण-

तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबात निर्मला यांचा १८ ऑगस्ट १९५९ रोजी जन्म झाला. तामिळनाडूत बी.ए. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी दिल्लीत धाव घेतली. दिल्लीतील नामांकित जवाहरलाल नॅशनल युनिव्हर्सिटी अर्थात जेएनयु मध्ये प्रवेश घेतला. एक हुशार विद्यार्थिनी असा नावलौकिक त्यांनी अल्पावधीतच मिळविला.

त्यानंतर त्यांनी परराष्ट्र संबंधात पी.एचडी पदवीही मिळविली . आंध्रप्रदेशातील राजकारणात सक्रिय असलेले नेते परकला प्रभाकर यांच्याशी १९८६ मध्ये निर्मला ह्या विवाहबद्ध झाल्या.काही कालांतराने त्या लंडनला स्थायिक झाल्या पण त्यांचे मन काही तिकडे रमले नाही आणि त्या पुन्हा मायदेशात परत आल्या.

राजकीय प्रवास-

सन २००३ ते २००५ दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगासाठी काम करताना त्या सुषमा स्वराज यांच्या संपर्कात आल्या. आणि येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली . निर्मला सीतारमण यांची आंध्रप्रदेशातून राज्यसभेवर नियुक्तीही झाली होती. सध्या त्या कर्नाटकातून राज्यसभा संसद आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या सरकारच्या काळात त्यांच्यावर संरक्षण खात्याची जबाबदारी देऊन नवा इतिहास रचला होता . निर्मला सीतारमण यांच्यापूर्वी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ ला केवळ २० दिवस आणि १९८० ते १९८२ अशी दोन वर्षे या पदावर काम बघितले. मात्र फक्त संरक्षण खात्याची पूर्ण जबाबदारी असलेल्या पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान निर्मला सीतारामन यांनी मिळविला आहे.

त्याच प्रमाणे निर्मला सीतारमण यांना मोदी सरकार २.० मध्ये सुद्धा अर्थ खात्याची पूर्ण जबाबदारी मिळाली आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत. त्याआधी इंदिरा गांधींनी १९७०-१९७१ मध्ये पंतप्रधानपदाबरोबरच अर्थमंत्री पदाचा अतिरिक्त कारभार सांभाळला होता…!

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *