कोण आहेत हरदीप सिंह पुरी ज्यांना निवडणुकीत पराभवानंतरही मंत्री बनवण्यात आले?

काल राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत ५८ इतर नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मागील मंत्रिमंडळात असलेल्या अरुण जेटली, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू यांच्यासह इतर काही मंत्र्यांचा समावेश नाहीये.

मोदींचे नवे मंत्रिमंडळ अनेक कारणांनी सध्या चर्चेत आहे. मोदी सरकारमध्ये हरदीप सिंह पुरी यांना गृहनिर्माण आणि नगर विकास तसेच नागरी हवाई उड्डाण विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री करण्यात आले आहे. त्यांना दुसऱ्या वेळेस मोदी सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आले आहे.

पुरी यांनी पंजाबच्या अमृतसर येथून निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या गुरजीत सिंह औजला यांनी त्यांचा ९९६२६ मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये अमृतसरमधून अरुण जेटली यांनी निवडणूक लढवली होती. मोदी लाटेतही त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले आणि नंतर मोदी सरकारमध्ये महत्वाचे मंत्रिपद देण्यात आले होते.

अरुण जेटली यांच्या नंतर हरदीप सिंह पुरी हे अमृतसर मधून निवडणूक लढले आणि त्यांना देखील पराभव स्वीकारावा लागला. पण त्यांचा पराभव झाल्यानंतरही त्यांना मंत्रिपद मिळाले आहे. अरुण जेटली आणि पुरी हे खूप चांगले मित्र आहेत. दोन्ही मित्रांचा पराभव झाला मात्र दोघांनाही मंत्रिपद मिळाले.

कोण आहेत हरदीप सिंह पुरी-

हरदीप सिंह पुरी हे परराष्ट्र सेवा खात्यातील माजी अधिकारी आहेत. परराष्ट्र सेवेतील १९७४ च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. त्यांचा जन्म १५ फेब्रूवारी १९५२ ला झाला. त्यांनी परदेशात अनेक महत्वपूर्ण पदांवर काम केलं आहे. त्यांनी २००९ ते २०१३ मध्ये संघात भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं आहे.

पुरी यांनी मागील मंत्रिमंडळात असताना शहरी भागात स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी योजना आणि बेघर आवास योजनामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचे बोलले जाते.

त्यांचे वडील देखील राजकारणात होते. पुरी यांनी आपले शिक्षण बोर्डिंग शाळेतून घेतलेले आहे. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी मधील हिंदू कॉलेज, स्टिफेन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले आहे. पुढे ते आयएफएसमध्ये जॉईन झाले. त्यांनी आयएफएस अधिकारी लक्ष्मी पुरी यांच्यासोबत लग्न केले. हरदीप पुरी २०१३ मध्ये निवृत्त झाले.

त्यांनी आतापर्यंत ब्राझील, जपान, श्रीलंका, ब्रिटन आणि यूएन मध्ये बरेच काम केले आहे. त्यामुळे त्यांना विदेश नीती आणि राष्ट्रीय सुरक्षासंबंधित गोष्टींमध्ये जाणकार म्हणून ओळखले जाते. ते शिक्षण घेत असताना जेपी आंदोलनात देखील जोडले गेले होते. २ जानेवारी २०१४ ला त्यांनी भाजपात प्रवेश केला.

त्यांनी आतापर्यंत मोठमोठी पदे भूषवली आहेत. ब्राजील मध्ये भारताचे राजदूत म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी कमिटीचे चेअरमन पद देखील त्यांनी भूषवलं आहे.

हरदीप पुरी यांना खसरेकडून पुढील वाटचालीसाठी शुभेछा. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *