शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळालेले अरविंद सावंत नेमके आहेत तरी कोण?

१७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर नरेंद्र मोदी आज (३० मे) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. मोदी यांच्याबरोबर आज तब्बल ५० हुन अधिक मंत्री शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्यासाठी ८००० पाहुणे येण्याची शक्यता असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यास बिम्स्टेक देशांचे प्रमुख, व्हीव्हीआयपी आणि देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. आज भाजपचे बडे नेते शपथ घेणार आहेत. सोबतच भाजपच्या मित्रपक्षांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.

शिवसेनेकडून दोन जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. आज अरविंद सावंत हे शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ते शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून परिचित आहेत. सावंत यांची या आधीचं लोकसभेतलं कामही चांगलं आहे. ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

खासरेवर जाणून घेऊया अरविंद सावंत नेमके आहेत तरी कोण?

लोकसभेतही सक्रिय खासदार म्हणून अरविंद सावंत यांना ओळखले जाते. अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून १ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा त्यांनी पराभव केला.

अरविंद सावंत यांची लोकसभेतील उपस्थिती महाराष्ट्रातील खासदारांमध्ये सर्वाधिक आहे. सर्वाधिक उपस्थिती असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये त्यांचा (९७.३ टक्के) पहिला क्रमांक आहे.

शिवसेनेचा अभ्यासू, कष्टाळू आणि अत्यंत हुशार चेहरा म्हणून अरविंद सावंत यांना ओळखले जाते. ६८ वर्षीय सावंत यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झालेला आहे. ते सुरुवातीच्या काळात एमटीएनएलमध्ये अभियंता म्हणून नोकरी करायचे. सावंत यांनी १९६८ पासून गटनेते म्हणून शिवसेनेचे काम करण्यास सुरुवात केली. अरविंद सावंत यांनी 1969 साली सीमा आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली.

शिवसेनेत त्यांनी आजपर्यंत अनेक पदं भूषवली आहेत. गटनेतेपदापासून सुरुवात झालेल्या सावंत यांनी आपल्या हुशारी आणि कष्टाच्या जोरावर शिवसेनेचे उपनेते, खासदार आणि प्रवक्ते पद मिळवले. गटनेतेपदापासून सुरुवात केलेल्या या नेत्याने आता केंद्रीय मंत्रिपदापर्यंत झेप घेतली आहे.

१९९५ मध्ये महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर सावंत यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी देण्यात आली होती. २०१० मध्येही ते विधानपरिषदेचे आमदार होते. त्यांना २०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेसाठी संधी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा सव्वा लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आणि खासदार बनले.

अरविंद सावंत यांना पुढील वाटचालीसाठी खासरेकडून शुभेच्छा. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *