या ७ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला करावा लागला पराभवाचा सामना!

‘मोदी है तो मुमकीन है’, या गाण्याचे बोल सार्थ ठरवत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी एनडीएने ३५० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. जागांच्या आकड्यांच्या बाबतीत एकटा भारतीय जनता पक्षाने ३०३ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत.

एनडीएचा हा विजय २०१४ पेक्षाही मोठा ठरला. विरोधकांच्या महाआघाडीचा सुपडा साफ एनडीएने केला आहे. देशातील अनेक राज्यात भाजपने क्लीन स्वीप मारली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४१ जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीला ५ , काँग्रेसला १ आणि वंचित बहुजन आघाडीला १ जागा जिंकता आली आहे.

महाराष्ट्रात भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर महत्वाचा ठरला आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीने मिळवलेल्या अभूतपूर्व यशात वंचित आघाडीची मदत भाजपला झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव आढळराव पाटील, राजू शेट्टी, अनंत गीते अशा दिग्गज नेत्यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

राज्यात ७ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने खाल्लेल्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कारण या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि वंचितच्या उमेदवारांचे मिळून होतात.

खासरेवर बघूया महाराष्ट्रात कुठे कुठे वंचित बहुजन आघाडीमुळे आघाडीला पराभवाचा सामना सामना करावा लागला-

नांदेड-

महाराष्ट्रात सर्वात धक्कादायक निकाल नांदेड मतदारसंघाचा मानला जात आहे. नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला आहे. अशोकराव चव्हाण यांना भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ४० हजार मतांनी पराजित केले आहे. येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी १ लाख ६५ हजार मतदान घेतले आहे. वंचितला गेलेलं मतदान हे काँग्रेसचं हक्काचं मतदान मानलं जातं. चिखलीकरांना ४ लाख ८२ हजार मते मिळाली आहेत तर वंचित आणि आघाडीच्या मतांची बेरीज ६ लाख ७ हजार होते.

परभणी-

परभणीत देखील वंचित आघाडी मोठा फॅक्टर ठरला. येथून शिवसेनेच्या संजय जाधव यांनी ४२ हजार मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना ४ लाख ९६ हजार मते मिळाली तर वंचितच्या आलमगीर खान यांना १ लाख ४९ हजार मतदान मिळाले. संजय जाधव यांना ५ लाख ३८ हजार मते मिळाली तर वंचित आणि आघाडीच्या मतांची बेरीज येथे ६ लाख ४६ हजार होते.

बुलडाणा-

बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी १ लाख ३३ हजार मतांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ८८ हजार मते मिळाली तर वंचितच्या बळीराम शिरसकर यांना १ लाख ७२ हजार मते मिळाली. प्रतापराव जाधव यांना ५ लाख २१ हजार मते मिळाली असून येथे वंचितच्या आणि आघाडीच्या मतांची बेरीज ५ लाख ६१ हजार होते.

गडचिरोली-

गडचिरोली मधून भाजपचे अशोक नेते हे ७७ हजार मतांनी विजयी झाले आहेत. येथे काँग्रेसचे नामदेव उसेंडी मैदानात होते. त्यांना ४ लाख ४१ हजार मते मिळाली. तर वंचितच्या डॉ रमेश गलबे यांना १ लाख ११ हजार मते मिळाली. अशोक नेते यांना ५ लाख १९ हजार मते मिळाली. वंचित आणि आघाडीची मते हे भाजपच्या मतांपेक्षा जास्त आहेत. वंचित आणि आघाडीची मते मिळून हा आकडा ५ लाख ५२ हजारांवर जातो. येथेही वंचित आघाडी नसती तर वेगळा निकाल दिसला असता.

सोलापूर-

सोलापूरमध्ये तिरंगी लढत झाली. यामध्ये भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांनी बाजी मारली. काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांचा त्यांनी १ लाख ५८ हजार मतांनी पराभव केला आहे. येथे जयसिद्धेश्वर स्वामींना ५ लाख २४ हजार, शिंदेंना ३ लाख ६६ हजार मते तर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना १ लाख ७० हजार मते मिळाली आहेत. येथे वंचित आणि आघाडीच्या मतांची बेरीज केली असता ती ५ लाख ३६ हजारांवर जाते.

हातकणंगले-

येथील निकाल देखील धक्कादायक राहिला. शिवसेनेचे धैर्यशील माने हे जायंट किलर ठरले. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा ९६ हजार मतांनी पराभव केला आहे. धैर्यशील मानेना ५ लाख ८५ हजार, राजू शेट्टींना ४ लाख ८९ हजार तर वंचितच्या अस्लम सय्यद यांना १ लाख २३ हजार मते मिळाली. वंचित आणि आघाडीची मते मिळून ६ लाख १३ हजार होतात जे शिवसेनेपक्षा २८ हजार अधिक होतात.

सांगली-

सांगलीत देखील तिरंगी लढत होती. येथून भाजपच्या संजय पाटील यांनी १ लाख ६१ हजार मतांनी विजय मिळवला. संजय पाटलांना ५ लाख ३ हजार, स्वाभिमानीच्या विशाल पाटील यांना ३ लाख ४२ हजार तर वंचितच्या गोपीचंद पडळकर यांना २ लाख ९७ हजार मते मिळाली. वंचित आणि आघाडीची मते मिळून ६ लाख ३९ हजार होतात. जे कि भाजपपेक्षा १ लाख ३६ हजारांनी अधिक आहेत.

या सात मतदारसंघातील आकडेवारी पाहता लक्षात येते कि वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आघाडीचे येथील गणित बिघडले आहे. वंचित बहुजन आघाडी नसती तर येथे कदाचित वेगळे निकाल दिसले असते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *