२०१४ आणि २०१९ मध्ये महाराष्ट्रातील या तीन नगरसेवकांना लागली आहे खासदारकीची लॉटरी!

कोणत्याही राजकीय नेत्याचे स्वप्न असते कि मोठ्यात मोठं पद आपल्याला मिळावं. आजपर्यंत आपण सरपंच पदापासून सुरुवात केलेले अनेक सामान्य नेते मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री झालेले अनेक उदाहरणे बघितले आहेत. त्यांचा प्रवास बऱ्याचदा टप्प्याटप्प्याने झालेला आहे. पण नगरसेवक असलेल्या व्यक्तीला थेट खासदारकीचा जॅकपॉट लागणे म्हणजे सोन्याहून पिवळे.

नगरसेवकपदावर काम करताना दिल्लीत पोहोचण्याचे स्वप्न अनेकांना पडते. पण गल्लीतून थेट दिल्लीपर्यंत पोहोचणे फार कमी जणांच्या नशिबात असते. मात्र ही गरूडझेप घेणे आतापर्यंत तीन नगरसेवकांना शक्य झाले आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक नगरसेवकपदावरून थेट खासदारपदी निवडून आले आहेत.

महापालिका ही राजकीय प्रवासाची पहिली शिडी म्हणून ओळखली जाते. आपल्या प्रभागातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारा नगरसेवक कालांतराने विधानसभा आणि संधी मिळालीच तर लोकसभेत आपले नशीब अजमावत असतो. पण कित्येक वेळा त्या नगरसेवकाचे पक्षातील वजन यावर हे गणित अवलंबून असते. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील नगरसेवकांना थेट लोकसभेचे तिकीट मिळाल्याचेही यापूर्वी दिसून आले आहे.

नगरसेवक पदावर असलेल्या व्यक्तीला त्याचे पक्षश्रेष्टींसोबत असलेले चांगले संबंध जास्त महत्वाचे ठरतात. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील व्यक्तीला तिकीट मिळवण्यास जास्त अडचणी येत नाहीत. मुंबईतून नगरसेवक पदावरून खासदारकी मिळवलेल्या या दोन नेत्यांचे महापालिकेत चांगले वजन होते. २०१४ च्या निवडणुकीत खासदार झालेले शिवसेनेचे तेव्हाचे नगरसेवक राहुल शेवाळे हे चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते.

त्यामुळे राहुल शेवाळे यांना दक्षिण मध्य मुंबईतून तिकीट मिळवण्यास अडचण आली नाही. दक्षिण मध्य मुंबईतून त्यांनी निवडणूक लढवली आणि मोदी लाटेवर ते निवडूनही आले. या वर्षी दुसऱ्यांदा ते निवडून आले आहेत. तर यावर्षी नगरसेवक पदावरून खासदारकीचा जॅकपॉट लागलेले मनोज कोटक हे नशीबवान आहेत.

शिवसेना आणि ईशान्य मुंबईतील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या वादामुळे त्यांचे तिकीट भाजपने कापले. सोमय्यांचा पत्ता कट करून नगरसेवक कोटक यांना येथून उमेदवारी देण्यात आली. कोटक यांनी देखील मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

किरीट सोमय्या ईशान्य मुंबईतून उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण शिवसेनेसोबतच्या त्यांच्या वादामुळे त्यांना तिकीट आणि खासदारकीपासून दूर जावं लागलं. मनोज कोटक हे मुंबई महापालिकेचे भाजपचे गटनेते होते. मनोज कोटक यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे.

२०१४ च्या निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे देखील नगरसेवक पदावरून थेट खासदार झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली, तेव्हा ते नगरसेवकपदावरून थेट खासदार झाले. श्रीरंग बारणे १९९७ मध्ये सर्वप्रथम पिंपरी पालिकेवर निवडून आले. त्यानंतर, २०१२ पर्यंत ते सातत्याने पालिकेवर निवडून येत राहिले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *