लोकसभा निवडणुकीत या १४ माजी मुख्यमंत्र्यांचा झाला पराभव !

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ५४२ मतदारसंघातून जवळपास ८०४० उमेदवार उभे होते. २३ मे ला निवडणुकीचे निकाल समोर आले. हा दिवस कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी दुःखाचा ठरला. भाजपने एकहाती सत्ता मिळवून विरोधकांचा सुपडा साफ केला. अनेक दिग्गज, स्टार लोकांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या निवडणुकीत वेगवेगळ्या राज्यांच्या १२ माजी मुख्यमंत्र्यांनाही जनतेने पराभूत केले आहे. जाणून घेऊया कोण आहेत ते मुख्यमंत्री…

१) अशोक चव्हाण, काँग्रेस (नांदेड, महाराष्ट्र) – महाराष्ट्राचे डिसेंबर २००८ ते नोव्हेंबर २०१० दरम्यानचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि नांदेडचे विद्यमान खासदार हे पराभूत झाले आहेत. भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ४०१४८ मतांनी त्यांचा पराभव केला.

२) सुशिलकुमार शिंदे, काँग्रेस (सोलापूर, महाराष्ट्र) – जानेवारी २००३ ते नोव्हेंबर २००४ दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री, आंध्रप्रदेशचे माजी राज्यपाल आणि तीन वेळा सोलापूरचे खासदार सुशीलकुमार यांनाही पराभव पत्कारावा लागला आहे. भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी त्यांचा १५८६०८ मतांनी पराभव केला.

३) दिग्विजय सिंह, काँग्रेस (भोपाळ, मध्यप्रदेश) – डिसेंबर १९९३ ते डिसेंबर २००३ दरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, काँग्रेसचे विद्यमान राष्ट्रीय महासचिव, दोन वेळा लोकसभेत खासदार आणि विद्यमान राज्यसभा खासदार असणाऱ्या दिग्विजय सिंहांनाही पराभवाचा झटका बसला आहे. भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांचा ३६४८२२ मतांनी पराभव केला.

४) वीरप्पा मोईली, काँग्रेस (चिकबल्लापुर, कर्नाटक) – ऑक्टोबर १९९२ ते डिसेंबर १९९४ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री, माजी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री, माजी कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री, माजी ऊर्जामंत्री, माजी कायदेमंत्री आणि चिकबल्लापुरचे विद्यमान खासदार वीरप्पा मोईलांचाही पराभव झाले आहे. भाजपचे बी.एन.बाछेगौडा यांनी त्यांचा १८२११० मतांनी पराभव केला.

५) शीला दीक्षित, काँग्रेस (दिल्ली) – डिसेंबर १९९८ ते डिसेंबर २०१३ दरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री, केरळच्या माजी राज्यपाल, विद्यमान दिल्ली काँग्रेस कमिटी अध्यक्षा आणि माजी खासदार शीला दीक्षित यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. भाजपच्या मनोज तिवारींनी त्यांचा ३६६१०२ मतांनी पराभव केला.

६) हरीश रावत, काँग्रेस (नैनिताल-उधमसिंगनगर, उत्तराखंड) – फेब्रुवारी २०१४ ते मार्च २०१७ उत्तराखंडचे मुख्यमंत्री, माजी केंद्रीय जलसंपदा मंत्री, माजी कृषी व अन्नप्रक्रिया राज्यमंत्री, माजी केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री, माजी लोकसभा खासदार आणि राज्यसभा खासदार राहिलेल्या हरीश रावतांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. भाजपच्या अजय भट्ट यांनी त्यांचा ३३९०९६ मतांनी पराभव केला आहे.

७) भूपेंदर सिंग हुड्डा, काँग्रेस (सोनिपत, हरियाणा) – मार्च २००५ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान हरियाणाचे मुख्यमंत्री आणि चार वेळा खासदार राहिलेल्या भूपेंदर सिंग हुड्डा यांना यावेळेस पराभूत व्हावे लागले आहे. भाजपच्या रमेश चंदर कौशिक यांनी त्यांचा १६४८६४ मतांनी पराभव केला.

८) मुकुल संगमा, काँग्रेस (तुरा, मेघालय) – एप्रिल २०१० ते मार्च २०१८ मेघालायचे मुख्यमंत्रीही या निवडणुकीत पराभूत झाले असून नॅशनल पीपल्स पार्टीच्या अगाथा संगमा यांनी त्यांचा ६४०३० मतांनी पराभव केला आहे.

९) नबाम तुकी, काँग्रेस (पश्चिम अरुणाचल) – नोव्हेंबर २०११ ते जुलै २०१६ दरम्यान अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या नबाम तुकी यांचा भाजपच्या किरेन रिजिजू यांनी १७४८४३ मतांनी पराभव केला. ४

१०) जीतनराम मांझी, हिंदुस्थानी आवाम मोर्चा (गया, बिहार) – मी २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या जीतनराम मांझी यांना जनता दल युनायटेडच्या विजय कुमार यांनी १५२४२६ मतांनी पराभूत केले.

११) एच. डी. देवेगौडा, (तुमकूर, जनता दल सेक्युलर, कर्नाटक) – जून १९९६ ते एप्रिल १९९७ भारताचे माजी प्रधानमंत्री, डिसेंबर १९९४ ते मी १९९६ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री, विद्यमान खासदार आणि जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे एच. डी. देवेगौडा हे सुद्धा पराभूत झाले आहेत. भाजपच्या जी.एस.बसवराज यांनी त्यांचा १३३३९ मतांनी पराभव केला.

१२) मेहबुबा मुफ्ती, जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (अनंतनाग, जम्मू काश्मीर) – एप्रिल २०१६ ते जून २०१८ जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि अनंतनागच्या विद्यमान खासदार असणाऱ्या मुफ्ती महंमद सय्यद यांना जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सच्या हसनैन मसूदी यांनी ९६५६ मतांनी पराभूत केले.

१३) बाबुलाल मरांडी, झारखंड विकास मोर्चा (कोडर्मा, झारखंड) – नोव्हेंबर २००० ते मार्च २००३ दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री आणि दहा वर्षांपासून कोडर्माचे खासदार असणाऱ्या बाबुलाल मरांडी यांना भाजपच्या अन्नपूर्णाया देवी यांनी ४५५६०० मतांनी पराभूत केले.

१४) शिबू सोरेन, झारखंड मुक्ती मोर्चा (दुमका, झारखंड) – मार्च २००५ पासून मे २०१० पर्यंत दोन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कोळसा मंत्री आणि सहा वेळा खासदार राहिलेल्या शिबू सोरेन यांना भाजपच्या सुनील सोरेन यांनी ४७५९० मतांनी पराभूत केले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *