लोकसभा निवडणुकीची मतमोजणीची कशी करण्यात येते ?

मतदान ते मतमोजणी दरम्यान मतदान यंत्रे कुठे असतात ?

मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी EVM मशीन क्लोज करुन त्यावर झालेल्या मतदानाचा आकडा उपस्थित बूथ एजंटना देतात, जो नंतर मतमोजणीच्या वेळी पडताळून पाहिला जातो. सगळ्या मशिन्स बॉक्समध्ये ठेवल्यानंतर शिक्के मारुन वरती निवडणुक आयोगाची संरक्षणपट्टी लावतात. बूथ एजंट आणि निवडणुक अधिकाऱ्यांच्या सहीने मतदान यंत्रे सील करुन स्ट्रॉंगरुममध्ये जमा करण्यात येतात.

मतदान यंत्रांची सुरक्षा कशी केली जाते ?

मतदानयंत्रे स्ट्रॉंगरुममध्ये ठेवताना एकाच दरवाजाच्या खोलीत ठेवली जातात. इतर दारेखिडक्या कड्या किंवा विटा लावून बंद करण्यात येतात. खोलीच्या दाराला कुलूप लावून त्याला सील केले जाते. उपस्थित राजकीय प्रतिनिधीच्या सह्या घेतल्या जातात. खोलीची चावी जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्याकडे दिली जाते. या सगळ्याचे व्हिडीओ शूटिंग केले जाते.

त्यानंतर ही स्ट्रॉंगरुम २४ तास विद्युतपुरवठा, फायर ब्रिगेड आणि CRPF जवानांच्या निगराणीखाली ठेवली जाते. स्ट्रॉंगरुमच्या संरक्षणाची जबाबदारी एका IAS आणि एका Police अधिकाऱ्याकडे असते.

मतमोजणी कशी केली जाणार आहे ?

निवडणुक अधिकारी आणि उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या समोरच सकाळी ७ वाजता स्ट्रॉंगरुमचे सील उघडून मतदानयंत्रे बाहेर काढली जातील. CRPF जवानांच्या संरक्षणाखाली ती मतमोजणीच्या ठिकाणी आणली जातील. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल, हत्यारे किंवा आक्षेपार्ह वस्तु आणण्यास बंदी आहे.

मतमोजणी केंद्रात रिटर्निंग अधिकारी, उमेदवार, पोलिंग एजंट, मोजणी एजंट तसेच आतील प्रत्येक टेबलावर एक पर्यवेक्षक, एक असिस्टंट आणि एक सुक्ष्मनिरीक्षक असतील. ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल. नंतर सैनिकांची मते मोजली जातील.

EVM मशीन आणि VVPAT मतांची मोजणी कशी करण्यात येईल ?

EVM मशीन सुरु करुन त्यात कोणतीही छेडछाड झाली नसल्याची खात्री करण्यात येईल. विधानसभेच्या मतदारसंघानुसार मतमोजणीच्या १५ ते ३० फेऱ्या होतील. एका फेरीत १४ पोलिंग बुथची मोजणी होईल. साधारणपणे ३० मिनिटांच्या एका फेरीची मतमोजणी झाल्यावरच निवडणुक अधिकाऱ्याची सही होऊन पुढच्या फेरीला सुरुवात होईल.

सर्व EVM मशीनच्या मोजणीनंतरच प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच VVPAT आणि EVM यातील मतांची क्रमाने मोजणी करुन पडताळणी होईल. त्यात फरक आढळल्यास निवडणुक आयोगाला कळवण्यात येईल आणि त्यावर आयोग आपला निर्णय कळवेल. शेवटी सगळ्या गोष्टींची खातरजमा करुन अंतिम निकाल जाहिर केला जाईल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *