‘अडगळीतील कार्यकर्ता” राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे उघडणारा प्रसंग! कार्यकर्त्यांनी नक्की वाचा.

“राजु! तु यावेळेस भाऊसाहेबांच्या निवडणूक प्रचारात दिसला नाही. परवा निवडणूक निकाल.निवडणुकीत तुमचे नेते भाऊसाहेब निवडुन येणार आहेत की नाही?” घरासमोरील ओट्यावर बसलेल्या राजुला मी विचारले..
राजु ने उत्तर दिले- “दादा,राजकारण व निवडणूक प्रचार या बारा भानगडी आता सोडून दिल्या आहेत.आता आपलं काम भलं अन आपण भलं!” हे सांगताना राजुच्या डोळ्यात अश्रू आले होते.

“रडतोस का?”असे विचारल्यावर राजु आपबिती सांगू लागला…. आमच्या भागातील भाऊसाहेब हे मोठे राजकीय नेते.राजु हा भाऊसाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता. भाऊसाहेबांसाठी काम करण्यास राजू अर्ध्यारात्री सुद्धा तत्पर. भाऊसाहेब पहिल्यांदा नगरपालिका निवडणूकीत उभे तेंव्हापासून राजू त्यांच्या प्रचारात अग्रेसर असायचा.निवडणूक काळात झेंडे लावणे, फ्लेक्स लावणे,पोस्टर चिटकवणे, पॅपम्प्लेट वाटणे यात राजू सर्वात पुढे असायचा.

भाऊसाहेबांच्या नगरसेवक म्हणून कारकिर्दीनंतर भाऊसाहेबांना विधानसभा निवडणुकीची पक्षाने उमेदवारी दिली तेंव्हा राजुचा आनंद गगनात मावेना. भाऊसाहेबांना आमदारीत निवडून आणायचे या जिद्दीने राजू प्रचारात उतरला होता.उपाशीतापाशी उन्हातान्हात वेळकाळ याचे भान न ठेवता राजू गावोगावी प्रचार करू लागला.राजुचे स्टेज डेअरिंग चांगले,भाषणात शब्द फेक उत्तम म्हणून तो प्रचारात सदा पुढे असायचा. राजुच्या प्रयत्नाला यश मिळाले होते भाऊसाहेब आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडुन आले होते.

या निवडणूक प्रचारासाठी राजू १५ दिवस कामावर गेला नव्हता.राजू खासगी कंपनीत कामाला होता. न सांगता कामावर १५ दिवस दांडी मारल्यामुळे राजुला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.राजु आता बेरोजगार झाला होता. राजू एका कार्यक्रमात आमदार भाऊसाहेबांना भेटला व त्याला कुठेतरी नोकरीवर लावा म्हणून आमदार भाऊसाहेबांना विनंती केली.

भाऊसाहेबानी राजुला सांगितले की तो पदवीधर असता तर त्याला लगेच नोकरीवर लावले असते. त्याचे शिक्षण कमी असल्याने त्याला नोकरीसाठी थोडे दिवस वाट बघावी लागेल.कुठं जागा रिकामी झाली की राजुला नोकरीला लावतो असे आश्वासन देऊन आमदार साहेबांनी वेळ मारून नेली होती.

राजुच्या आयुष्यातील आता कठीण काळ चालू झाला होता. त्यातच राजुचा मुलगा सायकलवरून शाळेत जात असताना एका भरधाव मोटरसायकलने त्याला धडक दिली होती. मोटारसायकलवाला तिथून पळून गेला होता. राजुच्या मुलाच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती,हात व पाय फ्रॅक्चर झाले होते. राजुच्या मुलाचा मोठा अपघात झाला असल्याने स्थानिक दवाखान्यात उपचार होणे शक्य नव्हते.त्याला मोठया शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते.डोक्याला जबर दुखापत असल्याने त्या मुलाला आयसीयू मध्ये भरती केले होते.

मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज चालू असल्याने खूप खर्च येत होता.राजू मदत मागायला आमदार भाऊसाहेबाकडे गेला तेव्हा भाऊसाहेबाने पहिल्यांदा ५ हजार रुपये दिले.ऑपरेशन साठी व इतर दवाखान्याच्या खर्च अंदाजे तीन लाखाच्या पुढे जाणार होता.

राजू ने पुन्हा आमदार साहेबाना फोन केला तेव्हा आमदार साहेब मिटिंग मध्ये व्यस्त आहेत असे सांगून आमदार साहेबांच्या ऑफीस मधील लोकांनी त्याला टाळले होते.आमदार साहेबाकडून पैश्याच्या मदतीची अपेक्षा आता संपली होती.पैश्याची मदत द्यावी लागेल आमदार भाऊसाहेब राजुला टाळत होते. राजुने बायकोचे थोडेफार असलेले दागिने मुलाच्या उपचारासाठी विकले होते.

त्याची मोटारसायकल व मोबाईल फोन विकून सुद्धा पैश्याची नड भागत नव्हती.विकण्यासारखे घरात काही उरले नव्हते.कसेबसे नातेवाईककडून उसने पैसे व सावकरकडून व्याजाने पैसे आणून त्याने हॉस्पिटलचा खर्च भागविला होता. सुदैवाने राजुचा मुलगा अपघातातून वाचला होता.ऑपरेशन यशस्वी झाले होते.दवाखान्याच्या खर्चामुळे राजू कर्जबाजारी झाला होता.

मुलाची काळजी घ्यावी लागत असल्याने राजुची पत्नी कामाला जाऊ शकत नव्हती.निवडणूक प्रचारासाठी सुटी घेतल्याने राजुची नोकरी गेली होती. आता राजू शिफ्टने रिक्षा घेऊन रिक्षा चालवू लागला होता.रिक्षा मालकाला शिफ्टचे भाडे देऊन तो आता दिवसाला चारशे पाचशे रुपये कमावू लागला होता. जीवनात असा अनुभव आल्याने आता राजुने राजकारणाचा नाद सोडला होता.तो आपले रिक्षा चालवायचं काम करत होता. रिक्षाचे काम सांभाळून घर संसाराकडे लक्ष घालू लागला होता..

निवडणूक प्रचारामुळे नोकरी गेली, बेरोजगार झाला व त्यानंतर मुलाचा अपघात या घटनेमुळे राजुचे आयुष्य बदलून गेले होते.जीवनाचा खरा रंग त्याला कळून चुकला होता. त्यामुळे मागील निवडणूकित सक्रियपणे प्रचार करणारा राजू या निवडणुकीत प्रचार व राजकारणापासून अलिप्त राहिला होता.

मित्रांनो आपल्या भोवताली असे अनेक राजू दिसत असतील.काही राजू जीवनात अशी ठेच लागल्याने सुधारले अन काही राजू मात्र अजूनही सुधारण्याच्या मनस्थितीत नाहीत. निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हाल फार वाईट.आपण कोणासाठी व कशासाठी काम करतो हे कार्यकर्ता समजेपर्यंत आयुष्यातील वेळ निघून गेलेली असते.

आपला नोकरी,व्यवसाय शेती उद्योग सांभाळून कार्यकर्त्यांनी राजकीय प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे.नाहीतर राजू सारखी परिस्थिती आयुष्यात आल्याशिवाय राहत नाही. राजकीय पक्षांचे तसेच सामाजिक संघटनांचे नेते राजू सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा वापर आपली सत्तेची पोळी भाजण्यासाठी करत असतात वैयक्तिक स्वार्थासाठी करत असतात.

म्हणून राजकीय कार्यकर्त्यांनी अश्या संधीसाधू लबाड राजकीय नेते व समाज नेत्यापासून दूर राहीले पाहिजे.जो नेता तुम्हाला अडचणीच्या काळात साथ देतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

-दिलीप नारायणराव डाळीमकर
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *