जेव्हा राजीव गांधींनी सुरक्षारक्षकांच्या गाड्यांच्या चाव्या काढून पावसात फेकून दिल्या…

एअर इंडियात काम करणारे राजीवजी अपघातानेच राजकारणात आले. सर्वात तरुण प्रधानमंत्री म्हणून काम करताना त्यांनी संगणक, दूरसंचार, इंटरनेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला शक्तिशाली बनविण्यासाठी प्रयत्न केले. लोकांनी भरभरून प्रेम दिल्याने राजीवजीही लोकांमध्ये मिसळत असत. मात्र इंदिरा गांधींच्या हत्येचा अनुभव पाहता राजीवजींचे सुरक्षारक्षक वारंवार त्यांना लोकांमध्ये जाण्यापासून रोखायचे. राजीवजींना ते आवडत नसायचे. अशा परिस्थितीत राजीव गांधी आणि सुरक्षारक्षकांमध्ये घडलेला हा प्रसंग…

राजीव गांधींचा बेधडकपणा

इंदिरा गांधींची हत्या झाल्यांनतर राजीव गांधी आणि कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली. परंतु सतत सुरक्षारक्षक आपल्या मागे असलेले त्यांना आवडत नसायचे. संधी मिळेल तेव्हा सुरक्षारक्षकांची नजर चुकवून ते स्वतःच गाडी घेऊन बाहेर पडायचे. यामुळे सुरक्षारक्षकांची मात्र चांगलीच तारांबळ उडायची. राजीव गांधींबद्दलच्या अशाच एका बेधडक प्रसंगाचे वर्णन माजी केंद्रीय गृह सचिव आर.डी.प्रधान यांनी त्यांच्या “माय इयर्स विथ राजीव अँड सोनिया” या पुस्तकात केले आहे.

जेव्हा राजीव गांधी गाड्यांच्या चाव्या काढून फेकून देतात

घटना ३० जून १९८५ ची आहे. एअर चीफ मार्शल लक्ष्मण माधव कात्रे यांच्या मृत्यूची बातमी मिळताच राजीव गांधींनी सोनिया गांधींना सोबत घेऊन कात्रेंच्या घरी संवेदना व्यक्त करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. घराबाहेर पडताच राजीवजींना समोर कडक सुरक्षा व्यवस्था दिसली. उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी आमच्या गाडीचा पाठलाग करू नका, असा सूचना केल्या.

काही अंतर पार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, सूचना करूनही सुरक्षारक्षकांचा ताफा त्यांच्या गाडीच्या मागेमागे येत आहे. यामुळे राजीवजी नाराज झाले. त्यांनी अचानक गाडी थांबवली. मुसळधार पाऊस पडत असताना ते आपल्या गाडीतून खाली उतरले. काहीच न बोलता ते आपल्या पाठीमागे येणाऱ्या तीन एस्कॉर्ट गाड्यांजवळ आले आणि तिच्या चाव्या काढून पावसाच्या पाण्यात फेकून दिल्या. नंतर आपल्या गाडीत बसून ते पुढे घराकडे निघून गेले. सुरक्षारक्षक तिथेच पावसात गोंधळलेल्या अवस्थेत उभे राहिले. १५ मिनिटानंतर राजीवजी सुरक्षित असल्याची बातमी समजल्यांनंतर सुरक्षारक्षकांच्या जीवात जीव आला.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *