मुख्यमंत्र्यांवरील एका टीकेमुळे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षणसंस्थेचे अनुदान झाले होते बंद !

कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी सातारा जिल्ह्यातील काले येथे रयत शिक्षणसंस्था स्थापन केली. या संस्थेने खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात शैक्षणिक परिवर्तनाचे काम केले. मात्र १९४८ मध्ये भाऊराव पाटलांनी तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्यावर एका प्रसंगात टीका केल्यामुळे त्यांनी रयत शिक्षणसंस्थेला मिळणारे सरकारी अनुदानच बंद केले होते. जाणून घेऊया काय होते ते प्रकरण…

आधी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांनी बहुजन समाजाला दिली गुंडाची उपाधी

३० जानेवारी १९४८ रोजी पुण्यातील नथुराम गोडसे या ब्राह्मण माथेफिरूने राष्ट्रपिता महात्मा गांधींवर गोळ्या झाडून त्यांचा खून केला. त्यावेळी महात्मा गांधींच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बहुजन समाजाने ब्राह्मणांच्या घरांवर हल्ले करायला सुरुवात केली. त्यावेळी बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. पुण्यातील घाबरलेल्या ब्राह्मण समाजाला धीर देण्यासाठी त्यांनी ८ फेब्रुवारी १९४८ रोजी शनिवारवाड्यावर एक सभा घेतली.

त्या सभेत ते म्हणाले की, “केवळ पुण्यातल्याच नाही तर देशातल्या सर्व ब्राह्मण समुदायाला मी आश्वासन देतो की, हा बाळासाहेब खेर जिवंत असेपर्यंत कोणालाही ब्राह्मण समाजाला संपवू देणार नाही. माझ्या अंगातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी त्यांच्यापासून ब्राह्मणाचे रक्षण करील.”

बाळासाहेब खेरांना कर्मवीर भाऊराव पाटलांचे खरमरीत उत्तर

महात्मा गांधींच्या खुनामुळे बहुजन समाज संतप्त असताना बाळासाहेब खेरांनी केलेल्या ब्राह्मणधार्जिण्या वक्तव्यामुळे तो अधिकच भडकला. कर्मवीर पाटलांनीही हे आवडले नाही. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी सातारा येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत खेरांच्या वक्तव्याला उत्तर देताना भाऊराव म्हणाले, “मला आश्चर्य वाटते की मुख्यमंत्री अशी जातीय मार्गाने का बोलत आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ब्राह्मणांचे नाहीत. ब्राह्मणांचे रक्षण विशाल अंतःकरण असणारा बहुजन समाज करेल. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत ही हिंसा रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.”

मोरारजी देसाईंनी कर्मवीरांना मूर्ख आणि अकार्यक्षम म्हणून केला अपमान

२७ फेब्रुवारी १९४८ रोजी तत्कालीन मुंबई प्रांताचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी सातारा दौऱ्यासाठी आले होते. जमलेल्या लोकांना संबोधित करतांना ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी केलेली मदत विसरून भाऊराव पाटील त्यांच्यावर टीका करत आहेत. असा माणूस कर्मवीर कसा असू शकतो ? असे लोक शिक्षणसंस्था कशा चालवू शकतात ? ते एक मूर्ख आणि अकार्यक्षम व्यक्ती आहेत.” मोरारजींच्या या वक्तव्याने उपस्थित लोक चिडले. बापूजी साळुंखे यांनी मोरारजींनी कडक शब्दात ताकीद दिल्यावर मोरारजींनी लोकांची माफी मागून आपले शब्द परत घेतले.

मुख्यमंत्र्यांनी केले अनुदान बंद; गाडगेबाबा, क्रांतिसिंह पाटील आणि बाबासाहेबांनी तारली संस्था

बाळासाहेब खेर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांमधील शाब्दिक चकमकीमुळे दोघांमधील संबंध बिघडले होते. त्यात मोरारजींनी आगीत तेल ओतले. भाऊराव पाटलांची रयत शिक्षणसंस्था बहुजन समाजाला सरकार आणि ब्राह्मणांविरोधात चिथावत असल्याचे कारण सांगून चिडलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना धडा शिकवण्यासाठी थेट रयत शिक्षणसंस्थेला मिळणारे शासकीय अनुदान बंद केले.

याविरोधात प्रचंड गदारोळ झाला. ही गोष्ट तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत गेली. त्यांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावली. क्रांतिसिंह नाना पाटलांनी धुळ्यातील ब्रिटिश खजिन्यातीच्या लुटीतील काही रक्कम रयतला देणगी म्हणून दिली. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे गाडगेबाबाचे निस्सीम भक्त होते. गाडगेबाबांना ही बातमी समजताच हातात खराटा घेऊन ते खेरांना भेटायला गेले आणि गोरगरिबांच्या पोरासोरांच्या टकुऱ्यातला उजेड का विझवत आहात ? अशा शब्दात त्यांना खडसावून विचारले. शेवटी खेरांना आपली चूक लक्षात आली आणि ३० जानेवारी १९४९ पासून रयत शिक्षणसंस्थेचे अनुदान परत सुरु झाले.

संदर्भ :
१) दैनिक ज्ञानप्रकाश, पुणे – ८ फेब्रुवारी १९४८ २) दैनिक लोकमान्य, मुंबई – १२ फेब्रुवारी १९४८ ३) साप्ताहिक जीवन, सातारा – २८ फेब्रुवारी १९४८
४) साप्ताहिक नेता,सांगली – ३ मार्च १९४८ ५) बॅरिस्टर पी.जी.पाटील व्याख्यान – २४ सप्टेंबर १९७६ ६) आर.एम.नलवडे सातारा यांच्यासोबतच्या अनौपचारिक चर्चा – ३० ऑक्टोबर १९७७

Edit

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *